पुणे : विधानसभा निवडणुकीत प्रत्येक पक्षाकडून जोरदार प्रचार होताना पाहायला मिळत आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप प्रत्यारोप देखील होताना दिसत आहेत. अशातच पुण्यातील वडगाव शेरी मतदार संघाची जोरदार चर्चा गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. पोर्शे कार अपघात प्रकरणावरून बदनामी करू नये, यासाठी वडगाव शेरीचे विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांनी सर्वच राजकीय पक्षांना नोटीस पाठवली होती. यात शरद पवार यांना देखील त्यांनी नोटीस पाठवली होती. यावरून आता वडगाव शेरी मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार बापूसाहेब पठारे यांनी विरोधी उमेदवार आमदार सुनील टिंगरे यांच्यावर जोरदार टीका करत "शरद पवारांना नोटीस पाठवणाऱ्या चिल्लर आमदाराला जनताच जागा दाखवेल," असं म्हटलंय.
भाजपा कार्यकर्ते शरद पवारांच्या पक्षात दाखल : पुण्यातील मोदीबाग येथे शरद पवार यांच्या उपस्थितीत भाजपाच्या अनेक नेत्यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. हडपसर मतदार संघातून स्थायी समितीचे माजी अध्यक्ष दिलीपआबा तुपे, संमित्र सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष अनिल तुपे यांनी तर वडगाव शेरी येथील माजी नगरसेविका रेखा टिंगरे, चंद्रकांत टिंगरे त्याचप्रमाणे धनकवडी परिसरातील समीर धनकवडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केला. "तेथील उमेदवारांना विजयी करण्यामध्ये आमचं मोलाचं योगदान राहिल," असा या सर्वांनी पवारांना शब्द दिला. त्याचबरोबर रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हा प्रतोद रामभाऊ भोकरे यांनी देखील शरद पवार यांच्या पक्षामध्ये प्रवेश केला. यावेळी बापूसाहेब पठारे यांनी विरोधी उमेदवारावर जोरदार टीका केली.