अहिल्यानगर :चारही बाजूंनी डोंगरदऱ्या, पाण्याचाही कुठलाच शाश्वत स्रोत नाही, मात्र अशा कठीण परिस्थितीतही 9 किलोमीटर अंतरावरून पाईपलाईनचं पाणी आणून दीड एकर क्षेत्रात पठ्ठ्यानं केळीची बाग फुलवली. या केळींची गोडी थेट इराणला लागली आहे. सध्या या केळींना प्रतिकिलो बावीस रुपयांचा बाजारभाव मिळाला. पहिल्याच तोड्यात 10 टन माल निघाला आहे, आणखी 30 टन माल निघणार आहे. ही यशोगाथा संगमनेर तालुक्यातील कोंची येथील किरण गोसावी या तरूण शेतकर्याची आहे.
शेडनेटमध्ये केळीचं पीक : किरण गोसावी हे शेतकरी नेहमीच शेतीमध्ये नाविन्यपूर्ण प्रयोग राबवत असतात. हा भाग डोंगरदऱ्यात असल्यानं पावसावरच मोठ्या प्रमाणात शेती अवलंबून आहे. मात्र, अशा कठीण परिस्थितीत गोसावी यांनी प्रथम शेततळ्याची निर्मिती केली आणि थेट 9 किलोमीटर अंतरावरून पाईपलाईनव्दारे पाणी आणून ते दीड एकर क्षेत्रात बनवलेल्या शेततळ्यात सोडलं. यानंतर त्यांनी दीड एकर क्षेत्रात शेडनेटमध्ये फेब्रुवारी महिन्यात केळीच्या रोपांची लागवड केली. विशेष बाब म्हणजे शेडनेटमध्ये केळीचं पीक घेतल्यानं केळीही अतिशय उत्तम दर्जाची आली आहेत. साडेनऊ महिन्यांनंतर केळीचे घड काढणीस आले. पुणे जिल्ह्यातील नारायणगाव येथील व्यापारानं कोंची येथे येऊन केळींची पाहणी केली आणि प्रतिकिलो 22 रुपये याप्रमाणे केळी खरेदी केली.
केळी थेट इराणला :गोसावी यांनी पिकवलेली केळी परदेशात पाठवण्यात आली आहे. पहिल्याच तोड्यात 10 टन माल निघाला असून जवळपास सव्वा 2 लाख रुपये नफा झाला आहे. आणखी 30 टन माल निघणार असल्याचं गोसावी यांनी सांगितलं. फेब्रुवारी ते मार्चपर्यंतच परिसरात पाणी असतं, यानंतर पाणीटंचाई निर्माण होते. मात्र असं असताना देखील केवळ शेततळ्याच्या माध्यमातून किरण गोसावी या तरूणानं शेडनेटमध्ये केळीची बाग फुलवली, त्यामुळं केळींचा आकारही चांगला झाला असून अनेक फायदे झाले. त्यामुळं या केळींची गोडी थेट इराणला लागली आहे. गोसावी हे नेहमीच शेतीमध्ये नाविन्यपूर्ण प्रयोग राबवत आहेत. मात्र यावेळेस त्यांनी केळी पिकाच्या माध्यमातून थेट इराणला झेप घेतली आहे. त्यामुळं त्यांची ही यशोगाथा इतर शेतकर्यांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरणारी असल्याचं दिसून येत आहे.