मुंबई - हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकाच्या पहिल्या टप्यातील पूर्ण झालेल्या कामाची उद्धव ठाकरे यांच्याकडून आज पाहणी करण्यात आली. बाळासाहेब ठाकरे यांचं पहिल्या टप्प्यातील स्मारकाचं अतिशय सुरेख आणि सुंदर असं काम पूर्ण झालेलं आहे. पहिल्या टप्प्यात स्ट्रक्चर बनवण्यात आलं आहे. दरम्यान, याच्या भूमिपूजनाला मी उपस्थित होतो. तर २०२६ मध्ये याचं उद्घाटन होणार आहे. उद्घाटनाला जे उपस्थित असतील ते श्रेय घेतील आणि महत्त्वाचं म्हणजे श्रेय घेण्यापेक्षा बाळासाहेबांचं कार्य हे जनतेपर्यंत पोहोचणं अधिक महत्त्वाचे आहं, असे उद्गार उद्धव ठाकरेंनी काढले. स्मारकाच्या पाहणीनंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते. यावेळी आदित्य ठाकरे, सुभाष देसाई खासदार संजय राऊत, अरविंद सावंत असे नेते उपस्थित होते.
जीवनपट दाखवला जाणार -पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, आज पहिल्या टप्प्यातील कामाची पाहणी केली. या स्मारकावरून चर्चा सुरू आहे. हा महापौर बंगला आहे आणि येथे बाळासाहेब यांचे स्मारक होत आहे. मूळ महापौर बंगल्याला कुठेही धक्का न लावता काम पूर्ण केलं आहे. बाजूला समुद्र आहे. त्यामुळे ती खबरदारी घेऊन पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झालय. बाळासाहेब नेहमी म्हणायचे की मी कपाटातील माणूस नाही तर मैदानातील माणूस आहे. दुसऱ्या टप्प्यााचा आराखडा पूर्ण केला आहे. दरम्यान, बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकामध्ये त्यांचा पूर्ण जीवनपट दाखवला जाणार आहे. यात त्यांची भाषणे, व्यंगचित्रे, सभा हे सर्व दाखवले जाणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितलं.
जे सरकार असेल त्याचे श्रेय - बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकावरून श्रेयवादाची लढाई सुरू आहे. याचं तुम्ही भूमिपूजन केलं होतं आणि २०२६ मध्ये उद्घाटन आहे. त्यामुळे याचं नेमकं श्रेय कुणाचं? असा प्रश्न उद्धव ठाकरेंना विचारला असता, उद्घाटनाळी जे उपस्थित असतील आणि जे सरकार असेल त्यांचं श्रेय, असं मिश्किल उत्तर उद्धव ठाकरेंनी दिलं. हे स्मारक पाहण्यासाठी कोणतंही शुल्क आकारण्यात येऊ नये अशी आमची मागणी आहे. दरम्यान, आपण जे सरकार उपस्थित असेल त्यांचं श्रेय असं तुम्ही म्हणाला, त्यामुळे तुमचं सरकार येणार का? असं उद्धव ठाकरेंना विचारलं असता, मी कुठेही आमचं सरकार येणार किंवा बदलणार असं म्हणालो नाही. जे सरकार उपस्थित असेल, त्यांचं श्रेय एवढंच म्हणालो, असे उद्धव ठाकरेंनी म्हटलं असता, यावेळी एकच हशा पिकला.