ठाणे Akshay Shinde Encounter :-बदलापूर येथील एका शाळेत झालेल्या दोन चिमुकलींवरील अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे हा पोलिसांच्या चकमकीत मारला गेला आहे. मात्र अक्षय शिंदे याचा इन्काऊंटर करून या प्रकरणातील अन्य आरोपींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न गृह विभाग आणि सरकारने केला असल्याचा आरोप अक्षय शिंदेचे पालक आणि विरोधी पक्षांनी केला आहे. इतकेच काय महायुतीतील सहकारी पक्षाच्या नेत्यांनीही गृह विभागाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. बदलापूर येथील एका शाळेत झालेल्या दोन चिमुकलींवरील अत्याचारप्रकरणी अक्षय शिंदे या आरोपीला अटक करण्यात आली होती. याबाबतचा अहवाल विशेष तपास पथकाने तयार करूनही तो सरकारला सादर केला नाही. हा अहवाल ही सरकारच्या सांगण्यानुसारच तयार केला गेला असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक आरती सिंग यांनी हा अहवाल सरकारला देण्यापूर्वीच या प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदेला चकमकीत ठार करण्यात आले आहे.
काय आहे प्रकरण? : बदलापूर येथे ऑगस्ट महिन्यात एका शाळेत दोन लहान चिमुकलींवर अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी संबंधित मुलींचे पालक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गेले असता त्यांची तक्रार दाखल करून घेतली नाही. पालकांना जवळपास 12 तास ताटकळत ठेवण्यात आले, मात्र तक्रार दाखल करून घेतली नाही. अखेर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी दबाव आणल्यानंतर ही तक्रार दाखल करून घेण्यात आली. मात्र त्यानंतरही कारवाई झाली नव्हती. हे लक्षात येताच स्थानिकांनी केलेला उठाव आणि बदलापूर रेल्वे स्थानकात केलेल्या उग्र आंदोलनानंतर अखेर सरकारला नमते घेऊन याप्रकरणी चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले. तसेच दीपक केसरकर यांनी संबंधित शाळेवर कारवाई करण्याबरोबरच सीसीटीव्ही फुटेज देण्यासंदर्भात आदेश दिले. मात्र या प्रकरणातील संस्थाचालक आणि शाळेवर कारवाईचे आदेश देऊनही फारसे काही घडताना दिसले नाही.
सीसीटीव्ही फुटेज गायब :दरम्यान, या शाळेतील घटना घडली त्यादरम्यानचे 15 दिवसांचे सीसीटीव्ही फुटेज गायब झाले असल्याचे निदर्शनास आले. नेमके याच काळातील सीसीटीव्ही फुटेज कसे गायब झाले. यामागे संस्थाचालकांचा काही हात आहे का ? या प्रकरणात संस्थाचालकांचा काही सहभाग आहे का ? असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाले आहेत. मात्र त्याबाबत सरकारकडून फारशी कारवाई होताना दिसली नाही.
संस्थाचालक अद्यापही फरार : शाळेचे संस्थाचालक कोण आहेत? आणि त्यांचे राजकीय लागेबांधे काय आहेत याविषयी कमालीची गुप्तता पाळण्यात आली आहे. संस्थेचे संस्थाचालक आतापर्यंत फरार असून, त्यांना अटक करण्यात सरकारला यश आले नाही. तसेच त्यांना फरार होण्यासाठी सरकारने मदत केल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.
अक्षय शिंदेचा एन्काऊंटर :या प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याला न्यायालयातून पोलीस ठाण्याकडे नेत असताना मुंब्रा येथे त्याने पोलिसांची पिस्तूल हिसकावून त्यांच्यावर गोळीबार करण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईत गोळ्या लागून त्याचा मृत्यू झाला, असे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. मात्र यासंदर्भात अक्षय शिंदेचे आई-वडील यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले असून, माझ्या मुलाला जाणूनबुजून मारण्यात आल्याचं सांगितलं आहे. त्याची कोणतीही चूक नव्हती म्हणूनच जे खरे गुन्हेगार आहेत ते सापडू नयेत म्हणून माझ्या मुलाला ठार केले, महायुती सरकारने याची भरपाई द्यावी, अशी मागणी त्याच्या कुटुंबीयांनी केली आहे. दुसरीकडे विरोधी पक्ष आज न्यायालयात जाऊन चौकशीची मागणी करणार आहे. अक्षय शिंदे याच्या मृत्यूनंतर या प्रकरणातील अनेक बाबी समोर येणार नाहीत. खरे संस्थाचालक जर आरोपी असतील तर त्यांना वाचवण्यासाठी हा सगळा बनाव केला आहे का? असा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे यासंदर्भात आता चौकशी व्हावी, अशी मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे.