मुंबई :राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांची शनिवारी बांद्रे येथे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या घटनेबाबत माहिती देण्यासाठी मुंबई पोलिसांनी रविवारी पत्रकार परिषद घेतली. घटना कशी घडली? यात कोणाचा हात आहे? तपास कुठपर्यंत आला? याबाबतची माहिती गुन्हे शाखेचे डीसीपी दत्ता नलावडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पोलिसांनी धाडसानं दोन आरोपींना पकडलं :"बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण गुन्हे शाखेकडं देण्यात आलं आहे. घटनास्थळावरुन एक आरोपी पळून गेला आहे. अटक केलेल्या दोन आरोपींकडून दोन पिस्तूल आणि 28 काडतुसे जप्त केली आहेत. या प्रकरणात लॉरेन्स बिश्नोई गँगचा हात आहे का? याचा तपास पोलीस करत आहेत. पोलिसांनी धाडसानं दोन आरोपींना घटनास्थळावरुन अटक केली आहे. लॉरेन्स बिश्नोई गँगबाबत एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पोस्टची सत्यता तपासण्याचं काम सुरू आहे," अशी माहिती गुन्हे शाखेचे डीसीपी दत्ता नलावडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
वाय दर्जाची सुरक्षा नव्हती : "मुलाच्या ऑफिसमधून बाबा सिद्दीकी हे बाहेर आले आणि लगेच त्यांच्यावर गोळीबार केला. तीन आरोपींनी हा गोळीबार केला. यातील दोन आरोपींना घटनास्थळावरुन अटक केली आहे. तीन पोलीस कर्मचाही हे बाबा सिद्दीकींच्या सुरक्षेसाठी तैनात होते. कॅटेगेराईज सुरक्षा बाबा सिद्दीकी यांना नव्हती अर्थात वाय दर्जाची सुरक्षा त्यांना नव्हती. तसंच एक पोलीस कर्मचारी घटनेवेळी तिथे हजर होता," अशी माहिती गुन्हे शाखेचे डीसीपी दत्ता नलावडे यांनी दिली.