मुंबई : राष्ट्रवादीचे नेते तथा माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकी यांची १२ ऑक्टोबर रोजी मुंबईत हत्या करण्यात आली. निर्मल नगर येथील झिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाबाहेर त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. या हल्ल्याची जबाबदारी बिश्नोई टोळीनं घेतली असल्याची चर्चा आहे. या हत्या प्रकरणाचा पोलीस कसून तपास करत असून, त्यांनी या हल्ल्यातील काही संशयित आरोपींना विविध ठिकाणांहून अटक केली. अशातच वडिलांच्या हत्येनंतर त्यांचे पुत्र व वांद्रे पश्चिम मतदारसंघाचे आमदार झिशान सिद्दीकी यांनी पहिल्यांदाच समाजमाध्यमांवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टद्वारे त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
मृत्यूचं राजकारण करू नका : झिशान सिद्दीकी यांनी 'एक्स' प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट शेयर केली. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, “माझ्या वडिलांनी गरीब निष्पाप लोकांचं जीवन सुधारण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या घरांचं व त्यांचं संरक्षण करताना आपला जीव गमावला. माझं कुटुंब आज मोडून पडलंय. परंतु, माझ्या वडिलांच्या मृत्यूचं राजकारण केलं जाऊ नये आणि त्यांचा संघर्ष व्यर्थ जाऊ नये असं मला वाटतं. मला न्याय हवा आहे, माझ्या कुटुंबाला न्याय हवा आहे."