महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'हमे प्यार दे' म्हणत सुदेश भोसले शिरले प्रेक्षकांमध्ये; अधिकाऱ्यांनी लुटला नृत्याचा आनंद, पाहा व्हिडिओ - सुदेश भोसले

Amravati Maha Culture Festival 2024: अमरावतीत शासनाच्या पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागातर्फे पाच दिवसीय 'महासंस्कृती महोत्सव' आयोजित करण्यात आला आहे. दरम्यान रविवारी पहिल्याच दिवशी रात्री सायन्सकोर मैदानावर 'सुदेश भोसले' (Sudesh Bhosle) यांच्या गाण्याच्या कार्यक्रमात अधिकाऱ्यांनी नृत्याचा आनंद लुटला.

Sudesh Bhosale
सुदेश भोसले

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 19, 2024, 11:02 AM IST

Updated : Feb 19, 2024, 12:33 PM IST

अमरावती Amravati Maha Culture Festival 2024 : शराबी चित्रपटातील 'हमे प्यार दे' हे गाणे म्हणत सुदेश भोसले (Sudesh Bhosle) थेट मंचावरून खाली उतरले. व्हीआयपी कक्षातील प्रेक्षकांना गाणे गात नमस्कार करून, थेट बॅरिकेट ओलांडून प्रेक्षकांमध्ये शिरले. सुदेश भोसले यांना हात मिळवण्यासाठी प्रेक्षकांची अक्षरशः झुंबड उडाली होती. गाणे गात असतानाच प्रेक्षकांच्या गराड्यात सुदेश भोसले शिरल्यामुळं कार्यक्रमाची रंगत वाढली होती. पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभाग महाराष्ट्र राज्य आणि अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीनं आयोजित महासंस्कृती महोत्सवा दरम्यान रविवारी रात्री सायन्सकोर मैदानावर सुदेश भोसले यांच्या गाण्याच्या कार्यक्रमात पाहता पाहता अधिकाऱ्यांनीदेखील नृत्याचा आनंद लुटला.



'मेहबूबा ओ मेहबूबा' आणि 'मै हूँ डॉन': 'महासंस्कृती महोत्सवात' सुदेश भोसले यांनी मंचावर एन्ट्री घेण्यापूर्वी त्यांच्या चमूतील मंगेश देशपांडे आणि प्रिया चव्हाण यांनी 'नटरंग' तसेच 'सैराट' चित्रपटातील गाणी सादर केली. लावारिस चित्रपटातील 'अपनी तो जैसे तैसे' या गाण्याच्या सुमधुर संगीताच्या तालावर सुदेश भोसले यांची मंचावर एन्ट्री झाली. 'अपनी तो जैसे तैसे थोडी ऐसे या वैसे' या गाण्याने सुदेश भोसले यांनी गाण्याला सुरुवात केली. 'शोले' चित्रपटातील 'मेहबूबा ओ मेहबूबा' आणि डॉन चित्रपटातील 'मै हूँ डॉन' हे गाणे सादर करताच अमरावतीकर आपल्या खुर्च्यांवरून उठून थेट नाचायला लागले होते. प्रेक्षकांचा उत्साह पाहता मंचावर देखील सुदेश भोसले यांच्यासह मंगेश देशपांडे, प्रिया चव्हाण या गायकांचा उत्साह वाढला. विविध वाद्य वाजवणारे देखील चांगलेच जोशात आले होते.


लहान, मोठे सारेच थिरकले: सुदेश भोसले यांनी किशोर कुमार, मोहम्मद रफी, महेंद्र कुमार यांच्यासह त्यांनी स्वतः गायलेली गाणी महासंस्कृती महोत्सवात सादर केली. सुरुवातीला हातवारे आणि टाळ्यांनी प्रतिसाद देणारे अमरावतीकर प्रेक्षक कार्यक्रमाच्या अखेरच्या टप्प्यात मात्र नाचायला लागले. निवासी जिल्हाधिकारी, उपायुक्त, महसूल, क्रीडा आणि महापालिकेचे अनेक अधिकारी कर्मचारी इतकेच नव्हे तर अधिकाऱ्यांच्या वाहनाचे चालक देखील यावेळी बेधुंद होऊन थिरकले. पुरुष अधिकारांचा जोश पाहून महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये देखील हळूहळू चांगलाच उत्साह निर्माण झाला. काही क्षणातच महिला, पुरुष असे सर्वच अधिकारी आणि कर्मचारी नाचण्यात रंगून गेले होते. त्यांच्यासोबत कार्यक्रमाला आलेल्या चिमुकल्यांनी देखील आपल्या आई-वडिलांना नाचताना पाहून नाचण्याचा ठेका धरला. काही अधिकारी आणि कर्मचारी तर थेट मंचावर चढून सुदेश भोसले यांच्यासमोर नाचायला लागले असताना सुरक्षारक्षकांनी मंचावर धाव घेऊन त्यांना खाली उतरवलं.



बस थांबा, पोलिसांनी केली विनंती :नियमानुसार सुदेश भोसले यांच्या गाण्याचा कार्यक्रम रात्री दहा वाजता बंद होणं अपेक्षित होतं. असं असलं तरी विभागाचे उपायुक्त, निवासी जिल्हाधिकारी, तहसीलदार असे अनेक अधिकारी बेधुंद होऊन नाचत असताना कार्यक्रमाची रंगत चांगलीच वाढली. 10:30 वाजताच्या सुमारास पोलीस अधिकारी थेट मंचावर चढले आणि त्यांनी सुदेश भोसले यांना आता थांबा अशी विनंती इशाऱ्याद्वारे केली. पोलिसांनी कार्यक्रम बंद करा अशी विनंती करताच सुदेश भोसले यांनी 'चलते चलते मेरे गीत याद रखना कभी अलविदा ना कहना' हे गाणे गाऊन अमरावतीकरांचा निरोप घेतला.

हेही वाचा -

  1. मेळघाटात एकाच ठिकाणी आहे दक्षिण आणि उत्तरवाहिनी 'ब्रह्मसती' देवी; जाणून घ्या इतिहास
  2. मेळघाटात 'सिपना पटेल'चा आहे अनोखा थाट, जाणून घ्या आदिवासी बांधव का करतात 'सिपना पटेल' वृक्षाची पूजा
  3. Vermicompost Production : मेळघाटातील मोथा गावात गांडूळ खत निर्मिती; महिलांना मिळाला आर्थिक संपन्न होण्याचा मार्ग
Last Updated : Feb 19, 2024, 12:33 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details