मुंबई ATS : शुक्रवारी उशिरा राज्यात अमली पदार्थ विरोधात दोन मोठ्या कारवाया करण्यात आल्या. पहिली कारवाई मुंबई गुन्हे शाखेनं मुंबईत केली, तर दहशतवाद विरोधी पथकानं पालघर जिल्ह्यात दुसरी कारवाई केली.
विदेशी नागरिकाला अटक : दहशतवाद विरोधी पथकानं (ATS) पालघर जिल्ह्यात मोठी कारवाई केली आहे. एटीएसनं एग्वे जॉन नावाच्या विदेशी नागरिकाला 3.37 कोटी रुपयांच्या एमडी ड्रग्जसह अटक केली. तर त्याचा सहकारी घटनास्थळावरून फरार झाला आहे. अटकेच्या वेळी त्याच्याकडून दोन किलो एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आलं. तर साथीदाराच्या पालघर जिल्ह्यातील नालासोपारा येथील घरातून एटीएसनं 250 ग्रॅम एमडी जप्त केलं आहे.
परराज्यातून मुंबईत अमली पदार्थ विकणाऱ्यांना अटक : त्यापूर्वी मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट 5 ने परराज्यातून अमली पदार्थ मुंबईत आणून त्यांची विक्री करणाऱ्या तीन जणांना अटक केली. गुन्हे शाखेनं गांजानं भरलेली दोन वाहनं जप्त केली असून, दोघांकडून सुमारे 374 किलो गांजा जप्त करण्यात आला. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत याची किंमत 1 कोटी 12 लाख रुपये आहे. गोपाळ नाटेकर, शरद पाटील आणि सुनील मोहिते अशी अटक करण्यात आलेल्यांची नावं आहेत. गुन्हे शाखेनं तिघांविरुद्ध नवघर पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल केलाय. पोलिसांनी चार वाहनंही जप्त केली आहेत.
गोपनीय माहिती मिळाली होती : गुन्हे शाखेला 15 फेब्रुवारीला मुंबईत काही जण गांजाच्या विक्रीसाठी येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे दोन पोलीस पथकं तयार करण्यात आली. या पथकांनी कारवाई करत दोघांना वाहनांसह ताब्यात घेतलं. तसेच या दोघांना गांजा पुरवणाऱ्या व्यापाऱ्याला जळगाव जिल्ह्यात सापळा रचून अटक करण्यात आली. तीन आरोपींपैकी एक संभाजीनगर आणि तर दोघं जळगावाचे रहिवासी आहेत.
हे वाचलंत का :
- नाशिकमध्ये ATS ची मोठी कारवाई, दहशतवाद्यांना आर्थिक मदत पुरवल्याप्रकरणी एकाला अटक
- मुंबई एटीएसची मोठी कारवाई, 3 बंदुका अन् 36 जिवंत काडतुसे जप्त; 6 अटकेत
- देशाची गोपनीय माहिती पाकिस्तानला पुरवली, नेव्हल डॉकमधील प्रशिक्षणार्थीला अटक