मुंबई - आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. अशातच मनसेने वांद्रे पूर्व विधानसभेतून आपला उमेदवार जाहीर केला असून, या उमेदवारामुळे महायुतीला मोठा फटका बसणार असल्याचे बोललं जातंय. माजी आमदार आणि भाजपाच्या मुंबई उपाध्यक्ष तृप्ती सावंत यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केलाय. राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी त्यांनी मनसेत प्रवेश केला. त्याचवेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तृप्ती सावंत यांना एबी फॉर्म दिलाय. वांद्रे पूर्व विधानसभेत महाविकास आघाडीतर्फे वरुण सरदेसाई तर महायुतीतर्फे झिशान सिद्दिकी निवडणुकीच्या रिंगणात आहेत. विशेष म्हणजे मनसेकडून तृप्ती सावंत आता निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे स्पष्ट झालंय. त्यामुळे इथे तिहेरी लढत होणार असून, ही लढत चुरशीची होईल, असं म्हटलं जातंय.
भाजपामधून मनसेमध्ये प्रवेश करणाऱ्या तृप्ती सावंत या माजी आमदार बाळा सावंत यांच्या पत्नी असून, त्या 2019 मध्ये देखील विधानसभेच्या रिंगणात अपक्ष उतरल्या होत्या. तृप्ती सावंत यांनी 2019 मध्ये अपक्ष निवडणूक लढवल्याने त्याचा मोठा फटका शिवसेनेला बसला होता. तर काँग्रेसला त्यांचा फायदा झाला आणि त्यांनी अपक्ष निवडणूक लढवल्याने या जागेवरून झिशान सिद्धिकी निवडून आले होते. 2019 मध्ये या विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसतर्फे झिशान सिद्दिकी निवडणुकीच्या रिंगणात होते. शिवसेनेतर्फे विश्वनाथ महाडेश्वर हे निवडणुकीच्या रिंगणात होते. तृप्ती सावंत यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला होता. 2019 मध्ये देखील इथे तिहेरी लढत झाली होती. या तिहेरी लढतीत तृप्ती सावंत यांचा फटका विश्वनाथ महाडेश्वर यांना बसला होता. त्यानंतर तृप्ती सावंत यांनी भाजपामध्ये प्रवेश केला.
आमदार बाळा सावंत यांच्या निधनानंतर वांद्रे पूर्व येथे 2015 मध्ये पोटनिवडणूक जाहीर झाली होती. या निवडणुकीत सध्याचे भाजपाचे खासदार नारायण राणेदेखील पराभूत झाले होते. बाळा सावंत यांच्या निधनानंतर तृप्ती सावंत या राजकारणात सक्रिय झाल्याचे दिसून येतंय. आता 2024 मध्ये पुन्हा एकदा तृप्ती सावंत निवडणुकीच्या रिंगणात असल्याने या निवडणुकीत त्यांचा फटका कोणाला बसतो, याचं चित्र लवकरच स्पष्ट होणार आहे.