नांदेड Ashok Chavan On Rahul Gandhi : "काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मुंबईतील जाहीर सभेत केलेले आरोप माझ्याविषयी असतील, तर ते तथ्यहीन आहेत. मी शेवटपर्यंत पक्षात कार्यरत होतो. राजीनामा देण्यापूर्वी कधीही सोनिया गांधी यांच्याकडं जाऊन माझी व्यथा मांडली नाही. त्यामुळे राहुल गांधी यांनी जी वक्तव्यं केली आहेत, ती केवळ राजकीय आहेत," असा दावा भारतीय जनता पार्टीचे खासदार अशोक चव्हाण यांनी केला आहे.
काँग्रेसचे नेते राहुल गांधींची टोलेबाजी :भारत जोडो न्याययात्रेच्या मुंबईतील शिवाजी पार्क येथे झालेल्या सांगता सभेत बोलताना काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी काँग्रेसमधून भाजपात गेलेल्या नेत्यांवर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी काँग्रेसमधून भाजपात गेलेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचं नाव न घेता सांगितले की, "एक नेते सोनिया गांधींना भेटले होते आणि ढसाढसा रडले होते. काँग्रेसमधल्या अनेक नेत्यांना असेच ब्लॅकमेल करून भाजपानं ओढून घेतलं," असा आरोप राहुल गांधी यांनी या सभेत बोलताना केला होता.
मी सोनिया गांधींना भेटलो नाही :या संदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना भाजपाचे खासदार आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण म्हणाले की, "मी जोपर्यंत काँग्रेसमध्ये होतो तोपर्यंत काँग्रेस पक्षाचे इमाने इतबारे काम करत होतो. मी राजीनामा देण्याच्या दिवसापर्यंत काँग्रेसच्या मुख्यालयात बसून काम करत होतो. मी ज्या दिवशी माझा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडं सोपवला त्यादिवशी सर्वांना समजले की मी राजीनामा देत आहे. त्यापूर्वी मी कधीही राजीनाम्याबाबत कोणाशीही बोललो नव्हतो. त्यानंतर मी माझ्या पक्षातील सदस्यत्वाचाही राजीनामा दिला. मात्र मी दिल्लीत जाऊन सोनिया गांधी यांची यासंदर्भात भेट घेतली नाही. त्यांना भेटून माझी व्यथा मी सांगितली, असे जे म्हटले जात आहे, तसे काहीही घडले नाही, हे मी स्पष्ट करतो," असं अशोक चव्हाण म्हणाले.
केवळ राजकीय विधानं आहेत, त्यात तथ्य नाही :"राहुल गांधी यांनी शिवाजी पार्क येथील सभेत माझं नाव न घेता केलेली विधानं ही राजकीय विधानं आहेत. त्यात कोणत्याही पद्धतीचं तथ्य नाही. त्यामुळे मी कोणाकडं जाऊन ढसाढसा रडलो, असे जे म्हटले जात आहे ते अयोग्य आहे. ही केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केलेली राजकीय विधानं आहेत, हे मी पुन्हा एकदा स्पष्ट करतो," असं चव्हाण यांनी सांगितलं. दरम्यान काँग्रेसचं नव्हे तर इतर पक्षाचे नेते भीतीपोटी भाजपा प्रवेश करत असल्याचं चव्हाण यांना विचारलं असता, "इतरांबद्दल मी बोलणार नाही, प्रश्न माझ्याबाबत आहे. पण मी निर्णय घेताना भाजपाचे भविष्य आणि भावितव्य असल्यामुळे मी भाजपामध्ये प्रवेश केला," असं अशोक चव्हाण म्हणाले.
हेही वाचा :
- Rahul Gandhi Speech : देशाच्या राजाचा आत्मा ईव्हीएम, ईडी, सीबीआयमध्ये; राहुल गांधींचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल
- INDIA Alliance Rally Mumbai : शिवाजी पार्कमधून 'इंडिया' आघाडीनं फुंकलं प्रचाराचं रणशिंग; विरोधकांचं एकच टार्गेट 'मोदी'
- Nyay Sankalp Sabha : भारत हा मोहब्बत वाला देश, मग द्वेष का पसरवला जातोय?- राहुल गांधी