शिर्डी Ashadhi Wari 2024 :महाराष्ट्राचं अराध्य दैवत असलेल्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी वारकऱ्यांची मांदियाळी पंढरपुरात दिसून येत आहे. दुसरीकडं साई बाबांना विठ्ठल स्वरुप माननाऱ्या वारकऱ्यांनी शिर्डीत दर्शनासाठी अलोट गर्दी केलीय. शिर्डी माझं पंढरपूर ही आरती साई बाबा मंदिरात नित्य नियमानं म्हटली जाते. त्याचीच प्रचिती आज झालेल्या भाविकांच्या गर्दीत दिसून येत आहे. साई बाबा संस्थाननंही एकादशीचं महत्त्व लक्षात घेत, शिर्डीत येणाऱ्या वारकऱ्यांसाठी 7 हजार किलो साबुदाना खिचडी आणि शेंगदाण्याचा झिरकं प्रसाद स्वरुपात बनवण्यात आला.
साई बाबांचे परमभक्त जात होते आषाढी वारीला :साई बाबा हयात असताना साई बाबांचे परमभक्त दासगणु महाराज हे आषाढीच्या वारीला दरवर्षी पंढरपूरला विठ्ठल दर्शनासाठी जात असत. दासगणु महाराजांची एक आषाढी वारी चुकली. त्यामुळे विठ्ठल दर्शनासाठी आतुर झालेल्या दासगणुंना साई बाबांनी विठ्ठलाच्या रुपात दर्शन दिलं. तेव्हापासून दासगणु महाराजांनी शिर्डी माझं पंढरपूर अशी रचना केल्याची अख्यायिका शिर्डीत सांगितली जाते. आजही साई मंदिरात साई बाबांच्या मंगलस्नानानंतर हीच आरती म्हटली जाते. असंख्य भाविक साई बाबांनाच विठ्ठल स्वरुप मानून दर आषाढीला साई बाबांच्या दर्शनासाठी शिर्डीला जावून विठ्ठलरुपी साईंचं दर्शन घेऊन धन्य होतात.
शिर्डीत सात हजार किलो खिचडीचा प्रसाद :साई बाबा संस्थाननं आषाढी एकादशीचं महत्व लक्षात घेऊन विठ्ठलाची प्रतिमा समाधीवर ठेऊन साई बाबांच्या मूर्तीला तुळशीची माळ अणि सुवर्ण आभुषणं चढवली आहेत. एरवी वर्षभर साई बाबांना फुलांची माळ घातली जाते. मात्र फक्त आषाढी एकादशीलाच बाबांना तुळशीची माळ घालण्यात येते. शिर्डीला येणाऱ्या भाविकांना असलेला उपवासाचा दिवस लक्षात घेऊन साई संस्थानच्या प्रसादालयात आज दिवसभर साबुदाण्याची खिचडी आणि झिरकं हेच प्रसाद म्हणून देण्यात येतो. एरवी साई बाबांच्या प्रसादालयात चपाती, दोन भाज्या, वरण भात, स्वीट, असा प्रसाद भाविकांना देण्यात येतो. मात्र महाशिवरात्री आणि आषाढी एकादशीला खास करून भाविकांना उपवास असतो. त्यामुळे साई बाबा संस्थानच्या वतीनं साबुदाना खिचडी आणि शेंगदाण्याचं झिरकं दिलं जातं.