चंद्रपूर :Chandrapur Crime : जिल्ह्यात कायद्याचा धाक राहीलाय की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कारण, गेल्या दोन महिन्यांत तब्बल 13 जणांची हत्या येथे करण्यात आली आहे. यातील बहुतांश घटनांमध्ये कौटुंबिक कलह असल्याचं समोर आलं आहे. नुकत्याच नागभीड येथे आरोपीने आपल्या आपल्या पत्नीसह दोन मुलींची हत्या केल्याची घटना ताजी आहे. या सर्व घटना पाहता अशा घटना रोखण्याचं एक मोठे आव्हान पोलिसांसमोर उभं राहील्याचं चित्र निर्माण झालं आहे.
कुऱ्हाडीचा मोठ्या प्रमाणात वापर : ग्रामीण भागात कुऱ्हाड हे अगदी सहज मिळते. जिल्ह्यात होणाऱ्या हत्येत कुऱ्हाडीचा शस्त्र म्हणून वापर करण्यात आला. नागभीड येथे आरोपीने आपल्या पत्नीसह दोन मुलींची हत्या केली, कोरपना तालुक्यात आरोपी मुलाने वडिलाची हत्या केली, गोंडपिपरी येथे पतीने पत्नीची हत्या केली. या सर्व घटनांत शस्त्र म्हणून कुऱ्हाडीचा वापर करण्यात आला. ब्रम्हपुरी येथे देखील अशीच घटना घडली आहे.
लवकरच सकारात्मक परिणाम दिसतील:वाढत्या खुनाच्या घटना हा चिंतेचा विषय आहे. मात्र, याबाबत आम्ही आवश्यक ते प्रयत्न करत आहोत. ग्रामीण भागात बरेचदा कौटुंबिक हिंसाचाराकडे दुर्लक्ष केलं जातं. याबाबत पोलीस पाटलांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. सोबत (112) हा आपत्कालीन संपर्क देखील उपलब्ध आहे. पोलीस कर्मचाऱ्यांना देखील याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. गुन्हेगारी प्रवृत्ती डोके वर काढू नये यासाठी प्रयत्न सुरू आहेत. लवकरच सकारात्मक परिणाम दिसतील अशी प्रतिक्रिया जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी दिली आहे.
जिल्ह्यात झालेल्या हत्येच्या घटना
- जानेवारीला नागभीड तालुक्यातील वासाळा मेंढा या गावात एका अल्पवयीन मुलाने आपल्या वडिलांच्या डोक्याला काठीने मारहाण केली. त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. दामोदर केशव गावतुरे (वय 52) असं मृत व्यक्तीचं नावं आहे.
- (23 जानेवारी)रोजी बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथे सचिन भाऊजी वंगणे या तरुणाचा खून करण्यात आला.
(25 जानेवारी)रोजी उद्धव ठाकरे गटातील युवा सेना शहराध्यक्ष शिवा वझरकर यांचाही निर्घृणपणे खून करण्यात आला. - (12 फेब्रुवारी)रोजी पती पत्नीच्या वादातून आरोपीने पत्नीचा खून केला. ब्रम्हपुरी तालुक्यातील मालडोंगरी येथे ही घटना घडली. जयदेव पिल्लेवान असं आरोपीचं नाव आहे.
- (16 फेब्रुवारी)रोजी एकाच दिवशी तब्बल तीन हत्येच्या घटना घडल्या. चंद्रपूर शहरातील अष्टभुजा वॉर्डात सुरज कुंवर या व्यक्तीचा खून करण्यात आला. गोंडपींपरी तालुक्यातील वेडगाव येथे चारित्र्याच्या संशयावरून आरोपीने पत्नीचा कुऱ्हाडीने खून केला. तर, बल्लारपूर शहरात प्रियकराने प्रेयसीची हत्या केली.
- (21 फेब्रुवारी)रोजी कोरपना येथे आरोपीने आपल्या जन्मदात्या आईवडीलांना संपवलं. आईचा गळा दाबून तर वडिलांचा कुऱ्हाडीने खून केला. मनोज पांडुरंग सातपुते (वय 45) याला पोलिसांनी अटक केली.
- (3 मार्च)रोजी नागभीड तालुक्यातील मौशी या गावात घडलेल्या घटनेमुळे संपूर्ण जिल्हा हादरला. अंबादास तलमले या नराधमाने पत्नी अलका अंबादास तलमले (वय 40) प्रणाली (वय 19) आणि तेजस्वीनी (वय 16) या तिघींची हत्या केली.
- (4 मार्च)रोजी घुग्गुस येथे दोन मित्रांच्या वादाचे रूपांतर मारहाणीत झालं. त्यामध्ये एकाचा मृत्यू झाला.