मनमाड (नाशिक) Market Committee : हमाली, तोलाईवरुन कांदा व्यापारी आणि माथाडी कामगारांमध्ये वाद निर्माण झाला. या वादामुळं लिलावात सहभागी न होण्याचा निर्णय व्यापाऱ्यांनी घेतलाय. त्यामुळं सलग दुसऱ्या दिवशी लासलगाव, नांदगाव मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील बहुतांश बाजार समित्यात कांदा, धान्य लिलाव बेमुदत बंद आहे. यामुळं आज सलग दुसऱ्या दिवशी बाजार समित्यांत शुकशुकाट पसरला. अगोदरच मार्च एन्डच्या हिशोबसाठी 4 दिवसांपासून बंद असलेल्या बाजार समित्या गुरुवारपासून सुरू होणार होत्या. मात्र, व्यापारी आणि माथाडी कामगारांच्या वादामुळं बेमुदत लिलाव बंद राहणार असल्यानं याचा सर्वात जास्त फटका हा शेतकऱ्यांना बसणार आहे.
नेमकं काय प्रकरण : हमाली, तोलाई कपातीवरुन माथाडी कामगार व व्यापारी यांच्यात जवळपास पंधरा ते वीस दिवसांपासून वाद सुरू आहे. जोपर्यंत तोडगा निघत नाही, तोपर्यंत लिलावात सहभाग घेणार नाही, असं जिल्हा व्यापारी असोसिएशननं जाहीर केले. मनमाड, नांदगाव, येवला, लासलगावसह जिल्हाभरातील सर्वच बाजार समित्या आजपासून बंद आहेत. मार्च एन्डनिमित्त गेल्या चार ते पाच दिवसांपासून बंद असलेल्या बाजार समिती उघडणार होत्या. मात्र, जिल्हा व्यापारी असोसिएशननं लिलावात सहभागी न होण्याचा निर्णय घेतल्याने जिल्हाभरातील बाजार समिती बंद राहिल्या आहेत. परिणामी शेतकऱ्यांचेदेखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.