नागपूर :राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते तथा माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या वाहनांवर मंगळवारी रात्री झालेल्या दगडफेकीच्या घटनेत अनिल देशमुख हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर नागपूर इथल्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. संपूर्ण घटनाक्रम कसा घडला याबाबत अनिल देशमुख यांचे खासगी स्वीय सहायक उज्वल भोयर यांनी काटोल पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. त्यात ते म्हणता की चार जणांनी अनिल देशमुख यांच्या वाहनावर दगडफेक केली. भाजपा जिंदाबाद, अनिल देशमुख मुर्दाबादचे नारे लावत निघून गेले, असं या तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे.
असा घडला दगडफेकीचा घटनाक्रम :"विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा अंतिम दिवस असल्यानं आमचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार सलील अनिल देशमुख यांच्या प्रचाराची सभा नरखेड येथे होती. ती सभा सायंकाळी 05 वाजताच्या सुमारास संपली, अनिल देशमुख, ड्रायव्हर धिरज चंडालीया आणि डॉ गौरव चतुर्वेदी आणि मी आम्ही सर्वांनी नरखेडमध्ये नागरिकांच्या घरी भेटी दिल्या. त्यानंतर आम्ही नरखेडवरून तिनखेडा भिष्णुर मार्गे काटोलला येण्यास निघालो. त्यावेळी आमची गाडी समोर होती आणि आमच्या कार्यकर्त्यांच्या 2 गाडया मागे होत्या. अंदाजे रात्री सव्वा आठ वाजताच्या दरम्यान बेल फाटा येथे आलो असता, त्याठिकाणी रस्त्याला वळण असल्यानं गाडीची गती कमी झाली. तेव्हा अचानक 4 अज्ञात तरुण गाडीसमोर आले. त्यापैकी एका व्यक्तीनं मोठा दगड अनिल देशमुख बसलेल्या समोरील काचावर मारला. त्यामुळे काचेला तडा गेला. अनिल देशमुख बसलेल्या बाजूनं एक दगड आला. मागच्या बाजुनं एक दगड आला आणि ते 'भाजपा जिंदाबाद अनिल देशमुख मुर्दाबाद' असे नारेबाजी करीत चौघंही 2 दुचाकी घेऊन भारसिंगी रोडनं पळून गेले. मी अनिल देशमुख यांच्याकडं पाहिले असता त्यांच्या कपाळावर रक्त निघत होते. आम्ही सर्व घाबरलेलो होतो. आम्ही अनिल देशमुख यांना त्या गाडीतून उतरवून आमच्या मागच्या गाडीत बसवून काटोल दवाखान्यात घेऊन गेलो. डॉक्टरांनी अनिल देशमुख यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी नागपूर इथं रेफर केलं आहे," असं तक्रारदारानं नमूद केलं आहे.