वाशीम : रिसोड मालेगाव विधानसभा मतदार संघासाठी महायुतीकडून शिवसेनेच्या विधानपरिषद सदस्य भावना गवळी यांना उमेदवारी देण्यात आली. महायुतीच्या अधिकृत उमेदवार म्हणून त्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. असं असताना भाजपाचे अनंतराव देशमुख यांनीही अपक्ष नामांकन दाखल केलं. यामुळे शिंदेसेनेत अस्वस्थता पसरली आहे. याअनुषंगानं युवासेनेनं पत्रकार परिषद घेत खंत व्यक्त केली असून इतर मतदार संघात वेगळी भूमिका घेण्याचा इशारा दिला आहे.
देशमुख यांना भाजपाकडून छुपा पाठिंबा -माजी खासदार अनंतराव देशमुख एकेकाळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते म्हणून परिचित होते. यापूर्वी त्यांनी २०१९ च्या विधानसभेत अपक्ष लढत दिली होती. काँग्रेसचे निष्ठावान म्हणून त्यांची ओळख होती. मात्र सातत्यानं त्यांना काँग्रेसकडून डावलल्याने अखेर पुत्र व पदाधिकाऱ्यांसह १४ मार्च रोजी भारतीय जनता पार्टीत प्रवेश घेतला. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळणार असल्याची देशमुख यांना अपेक्षा होती. परंतु ऐनवेळी शिंदे सेनेच्या माजी खासदार तथा विद्यमान विधान परिषद सदस्य भावना गवळी यांना उमेदवारी मिळाली. यामुळे नाराज झालेल्या देशमुखांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केला. देशमुख यांच्या बंडामुळे महायुतीची अडचण वाढणार असल्याचं बोललं जात आहे. अनंतराव देशमुख यांच्या भूमिकेविरुद्ध युवासेनेचे जिल्हाप्रमुख रवी भांदुर्गे यांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांसह पत्रकार परिषद घेत नाराजी व्यक्त केली. जिल्ह्यात तीन विधानसभा मतदारसंघ आहेत. यामध्ये दोन विधानसभा कारंजा आणि वाशीम हे भाजपाकडे असून रिसोड विधानसभा मतदार संघात महायुतीकडून शिवसेनेच्या नेत्या विधान परिषद सदस्या भावना गवळी यांना अधिकृत उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, असं असताना भाजपाचे नेते माजी खासदार अनंतराव देशमुख यांना भाजपाकडून छुपा पाठिंबा मिळत असून, उमेदवारी दाखल करण्याची सूचना त्यांना वारिष्ठांकडून मिळाली, अशी अफवा मतदार संघात आहे. भाजपाचे जिल्हाध्यक्ष अर्ज भरताना त्यांच्या सोबत होते. यामुळे या अफवांना महत्त्व प्राप्त होत आहे. शनिवारी वाशिम येथे युवासेनेनं पत्रकार परिषद घेत देखमुख यांच्या उमेदवारीवर नाराजी व्यक्त केली. याकडे महायुतीतील वरिष्ठ नेत्यांनी लक्ष देऊन रिसोड मतदार संघातील खोडसाळपणा बंद करावा, असं ते म्हणाले. यावेळी माजी जि. प. सदस्य बाळासाहेब देशमुख, वाशिम विधानसभा प्रमुख विजय शेळके, युवतीसेना जिल्हासचिव अश्विनी भुजबळ, युवासेना शहराध्यक्ष रोहित वनजानी, वैद्यकीय सेल जिल्हासचिव भागवत सावके यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.