अकोला Akola Accident:जिल्ह्यातील पातूरजवळ झालेल्या रस्ते अपघातात समोरासमोर कारची धडक होऊन सहा जण ठार झाले आहे. मृतामध्ये आमदार सरकानाईक यांच्या नातेवाईकासह एका चिमुकलीचा देखील समावेश आहे. रस्त्याचं काम सुरू असल्यानं एका बाजूनं रस्ता बंद करण्यात आलाय. त्यामुळं अपघात झाल्याचं बोललं जात आहे. अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले असून शुक्रवारी दुपारी ही घटना घडलीय.
अपघातात 6 जणांचा मृत्यू :अकोला ते हैदराबाद चारपाडी रस्त्यावरील पातूर वळणावर चारचाकी (क्र. एमएच 37 बीएल 9552) तसंच वाशिमहून येणारी चारचाकी (क्र. एमएच 37 व्ही 0511) यांच्यात समोरासमोर धडक झाली. या रस्त्याचं काम सुरू असल्यानं काही ठिकाणी वाहतूक वळवण्यात आलीय. दोन्ही चारचाकी समोरासमोर आल्यानं भीषण अपघात झाल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलंय. यापैकी एक गाडी अमरावती शिक्षक मतदार संघाचे आमदार किरण सरनाईक यांच्या भावाची आहे. प्राप्त माहितीनुसार या रस्ते अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला असून, मृतांची ओळख पटली आहे. यामध्ये किरण सरनाईक यांचा वाहन चालक अमोल शंकर ठाकरे, पुतण्या रघुवीर अरुण सरनाईक वाशिम, मुलगी शिवानी अजिंक्य आमले आणि नात अस्मिरा अजिंक्य आमले नागपुर यांचा समावेश आहे. हे सर्व सरनाईक यांच्या कारमध्ये प्रवास करत होते. अपघाताची माहिती मिळताच आमदार सरनाईक यांच्या घरी शोककळा पसरलीय.