अमरावती Self Made Rakhi Sold By Students :दिवसभर विविध राख्या तयार करुन या राख्या विकण्यासाठी विद्यार्थ्यांनी थेट गावातील चौकात भरणाऱ्या बाजारात दुकान थाटलं. या चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या सुंदर अशा राख्या पाहण्यासाठी आणि खरेदी करण्यासाठी ग्रामस्थांनी देखील गर्दी केल्याचं बघायला मिळालं. राखी पौर्णिमेनिमित्त अमरावती जिल्ह्यातील चांदुर रेल्वे तालुक्यात येणाऱ्या पळसखेड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीनं राबवला जाणारा आगळावेगळा उपक्रम चांदुर रेल्वे तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात कौतुकास्पद ठरतोय. प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी बनविलेल्या या राख्या आणि त्यांच्या विक्री संदर्भात 'ईटीव्ही भारत'चा हा स्पेशल रिपोर्ट.
146 विद्यार्थ्यांचा सहभाग : राखीपौर्णिमा सणाच्या निमित्तानं शाळेतील विद्यार्थ्यांना राखी तयार करण्याचा उपक्रम राबवण्याची कल्पना शाळेच्या मुख्याध्यापिका कुमुदिनी मेश्राम यांच्यासह शाळेतील शिक्षक तुळशीराम चव्हाण आणि प्रीती सपकाळ यांनी पुढं आणली. इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतच्या सर्व 143 विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला. प्रीती सपकाळ यांनी विद्यार्थ्यांना राखी नेमकी कशी तयार करायची यासंदर्भात प्रशिक्षण दिलं. ज्या विद्यार्थ्यांना उत्कृष्टरित्या राखी बनवण्याची कला प्रशिक्षणादरम्यान गवसली त्या विद्यार्थ्यांनी प्रत्येकी 20 ते 25 उत्कृष्ट दर्जाच्या सुंदर राख्या तयार केल्या. ज्या विद्यार्थ्यांना राखी तयार करणं जमत नव्हतं त्यांना तुम्ही छान देवराख्या तयार करू शकता अशा शब्दात प्रोत्साहन देऊन त्यांच्याकडून विविध रंगाच्या देवराख्या तयार करून घेण्यात आल्या. एकूणच शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यांचा सहभाग या उपक्रमात होता.
चार हजार रुपयांचा आणला कच्चामाल : राख्या तयार करण्यासाठी शाळेतील शिक्षकांनी कापड, मणी, वेलवेटचं कापड, लोकर असा कच्चा माल 4000 रुपयात आणला. नेमकं कोणते विद्यार्थी कुठल्या दर्जाच्या राख्या तयार करू शकतात, हे लक्षात आल्यावर प्रत्येक विद्यार्थ्यांना त्यांच्या कुवतीनुसार राखी तयार करण्याचं साहित्य वितरित करण्यात आलं. 15 ऑगस्टला देशाच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त शाळेत ध्वजारोहण सोहळा आटोपल्यानंतर प्रीती सपकाळ यांनी विद्यार्थ्यांना राखी कशी तयार करायची या संदर्भात थोडक्यात माहिती दिली. 16 ऑगस्टला शाळेत दिवसभर चिमुकल्यांनी राख्या तयार केल्या. विशेष म्हणजे तयार करण्यात आलेल्या राख्यांचं पॅकिंग देखील विद्यार्थ्यांनीच केलं.