जैतादही येथील जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शाळेत स्ट्रॉबेरी पार्टीचं आयोजन अमरावती Strawberry Party in School : मेळघाटातील डोंगरात चिखलदरा लगत मोथा येथे मोठ्या प्रमाणात स्ट्रॉबेरीचं उत्पादन घेतलं जातं. ही स्ट्रॉबेरी मेळघाटातील आदिवासी चिमुकल्यांना मिळावी या उद्देशानं गत दोन वर्षांपासून जैतादही येथील जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शाळेत खास स्ट्रॉबेरी पार्टीचं आयोजन केलं जातं. आता शाळेला सुट्टी लागली असली तरी खास स्ट्रॉबेरी पार्टीनिमित्त चिमुकल्यांचा किलबिलाट शाळेत पाहायला मिळाला. चवदार अशी स्ट्रॉबेरी चाखण्याचा आनंद शाळेतील आदिवासी चिमुकल्यांनी यावेळी घेतला.
स्ट्रॉबेरीनं सजली वर्ग खोली :मोथा येथील स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी गजानन शनवारे यांच्यावतीनं मेळघाटच्या पायथ्यालगत असणाऱ्या जैतादेही येथील शाळेत स्ट्रॉबेरी पाठवण्यात आली. शाळेचे मुख्याध्यापक गणेश जामुनकर, शिक्षक जितेंद्र राठी आणि शुभांगी येवले यांच्या मार्गदर्शनात शाळेतील विद्यार्थ्यांनी एका वर्ग खोलीतील बाकांवर ही रसदार स्ट्रॉबेरी छान सजवून ठेवली. सकाळी नऊ वाजेच्या सुमारास चिमुकल्यांना स्ट्रॉबेरीचं वाटप करण्यात आलं. यावेळी स्ट्रॉबेरी चाखताना चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर आगळावेगळा आनंद पाहायला मिळाला.
दोन वर्षांपासून केलं जातं स्ट्रॉबेरी पार्टीचं आयोजन : जैतादेही येथील जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शाळेमध्ये गत दोन वर्षांपासून स्ट्रॉबेरी पार्टीचं आयोजन केलं जातं. चिखलदरा लगत असणाऱ्या मोथा या गावात गजानन शनवारे या शेतकऱ्यानं आपल्या शेतात स्ट्रॉबेरीचा प्रयोग यशस्वी केलाय. आपल्या शाळेतील आदिवासी चिमुकल्यांना देखील स्ट्रॉबेरी मिळावी या उद्देशानं शाळेच्या शिक्षकांनी गजानन शनवारे यांच्याशी संपर्क साधला. काही सामाजिक संस्था देखील यासाठी समोर आल्या आणि 2022 च्या उन्हाळ्यात पहिल्यांदा जैतादही येथील शाळेतील चिमुकल्यांसाठी स्ट्रॉबेरी आणण्यात आली. स्ट्रॉबेरी हे फळ त्यावेळी या चिमुकल्यांनी पहिल्यांदा पाहिलं. यावर्षी देखील शाळेत पहिल्यांदाच येणाऱ्या विद्यार्थ्यांनी स्ट्रॉबेरी चाखल्याची माहिती शाळेतील शिक्षक जितेंद्र राठी यांनी दिली.
मेळघाटात अशी आली स्ट्रॉबेरी : स्ट्रॉबेरी म्हटली की सर्वप्रथम आठवण येते ती महाबळेश्वरची. मात्र, 2014-15 मध्ये अमरावतीच्या श्री शिवाजी उद्यान विद्या महाविद्यालयाच्या वतीनं मेळघाटातील मातीचं परीक्षण केल्यावर चिखलदरा तालुक्यातील काही गावांमध्ये स्ट्रॉबेरी शेती करणं शक्य असल्याचं स्पष्ट झालं. चिखलदरा तालुक्यातील पाच ते सहा गावांमध्ये 49 शेतकऱ्यांना प्रत्येकी दहा गुंठ्यावर स्ट्रॉबेरी लागवडीकरिता 100% अनुदानावर नाविन्यपूर्ण पारदर्शी प्रकल्प राबविण्यात आला, 2015 मध्ये आपल्या शेतात स्ट्रॉबेरीची लागवड करणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला किमान दीड ते दोन लाख रुपयांचे उत्पन्न झालं. यानंतर शेतकऱ्यांनी स्वतःच्या खर्चानं स्ट्रॉबेरी लागवड सुरू केली. आज केवळ मोथा गावामध्ये गजानन शनिवारे हे एकमेव शेतकरी स्ट्रॉबेरीचं उत्पादन घेत आहेत.
हेही वाचा -
- Strawberry in amravati : अमरावती जिल्ह्यात फुलवली स्ट्रॉबेरीची बाग; असा केला प्रयोग यशस्वी
- शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग, कोकणाच्या लाल मातीत उगवली स्ट्रॉबेरी; मिळवतोय चांगले उत्पन्न
- सातपुड्याच्या डोंगराळ भागात स्ट्रॉबेरी लागवडीचा यशस्वी प्रयोग