अमरावती Monument Erected By British : भारतीय स्वातंत्र्य लढा तीव्र होत असताना 16 फेब्रुवारी 1935 मध्ये अचानक मेळघाटातील हरिसाल लगतच्या जंगलाला आग लागली. यावेळी जंगलातील आग विझवण्यासाठी तत्कालीन वनपरिक्षेत्र अधिकारी नाझीर मोहम्मद हे आपल्या सहकाऱ्यांसह जंगलात शिरले. आग विझवण्याचे प्रयत्न करत असताना नाझीर मोहम्मद यांच्या जवळ आगीचा मोठा भडका उडाला. यात ते भाजले गेले. त्यांच्यासोबत असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी त्यांना जंगलातून बाहेर काढून अमरावतीतील रुग्णालयात दाखल केलं. मात्र, सात दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर 23 फेब्रुवारी 1935 रोजी त्यांची प्राणज्योत मालवली.
जंगल वाचविण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या नाझीर मोहम्मद यांचा इंग्रजांकडून मरणोत्तर सन्मान करण्यात आला. त्यावेळी इंग्रजांनी त्यांच्या स्मरणार्थ हरिसाल येथे त्यांचं स्मारक उभारलं. आजही हे स्मारक मेळघाटातील वन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना जंगल संरक्षणाची प्रेरणा देत आहे.
असे आहे स्मारक : हरिसाल येथील चौकशी फाटकाजवळ धारणीकडं जाताना डाव्या बाजूला नाझीर मोहम्मद यांच्या स्मृतीत विशेष स्मारक उभारण्यात आलंय. चुना आणि मातीचा ओटा बांधून त्यावर फरश्या बसवण्यात आल्या आहेत. या ठिकाणी नाझीर मोहम्मद यांच्या कार्याची माहिती संगमरवरी दगडामध्ये कोरण्यात आलीय. तसंच या स्मारकाच्या चारही बाजूनं फुलांची झाडं लावण्यात आली आहेत. तर स्मारकाच्या ठिकाणी कुंपण घालून फाटक बसवण्यात आलंय. या स्मारकाला 89 वर्ष झाली असली तरी हे स्मारक तशाच स्थितीत आहे. हरिसाल येथील रहिवासी कस्तुरे कुटुंबाच्या वतीनं या स्मारक परिसराची स्वच्छता राखली जाते. संपूर्ण कुटुंब या स्मारकाची काळजी घेत असल्याचं रुपेश कस्तुरे यांनी सांगितलं.