अमरावती Amravati Crime News :मेळघाटात गांजाची तस्करी सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. दोन तस्करांना धारणी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून 4 किलो 55 ग्रॅम गांजा आणि दुचाकी असा एकूण 1 लाख 42 हजार 990 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. संजय गोपाळ इंगळे (वय- 52), आणि शेख सलमान शेख हिसा (वय- 32) असं अटक करण्यात आलेल्या दोघांची नावं आहेत. हे दोघंही अकोला जिल्ह्यातील हिवरखेड येथील रहिवासी आहेत.
अशी झाली कारवाई : अमरावती अकोला जिल्ह्याच्या सीमेवर मेळघाटला लागून असणाऱ्या हिवरखेड येथील दोघेजण मेळघाटात गांजाची तस्करी करत असल्याची माहिती धारणी पोलिसांना मिळाली होती. यामुळं गेल्या दोन दिवसांपासून धारणीचे ठाणेदार अशोक जाधव यांच्या नेतृत्वात धारणी शहरालगत विविध मार्गांवर नाकेबंदी करून वाहनांची तपासणी केली जात होती. दरम्यान, धारणी ते कुसुमकोट मार्गावर नाकाबंदी दरम्यान एमएच 30 बीटी 2943 क्रमांकाच्या दुचाकीवर असणारे संजय आणि शेख सलमान यांची तपासणी केली असता त्यांच्याजवळ गांजाचा साठा आढळून आला.