पुणे : Uddhav Thackeray on Amit Shah :केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची काही दिवसांपूर्वी पुण्यातील बालेवाडी येथे बैठक झाली होती. या सभेत अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षानं हिंदुत्व सोडल्याचा आरोप अमित शाह यांनी त्यावेळी केला होता. त्यावरून उद्धव ठाकरे यांनी अमित शाह यांच्यावर निशाना साधला आहे. आज शिवसेना ठाकरे पक्षाची पुण्यात बैठक झाली. या सभेत उद्धव ठाकरेंनी अमित शाहांवर जोरदार टीका केली. “अहमद शाह अब्दालीचे अमित शाह राजकीय वंशज”, असल्याचा प्रहार यावेळी उद्धव ठाकरेंनी केला.
"आम्हाला हिंदूत्व शिकवू नये" :"काही दिवसांपूर्वी पुण्यात भाजपाचा कार्यक्रम झाला. इतिहासात डोकावलं, तर शाहिस्तेखान थोडा हुशार होता, असं म्हणावं लागेल. तीन बोटं कापल्यानंतर तो महाराष्ट्रात परत आला नाही. असंच अमित शाह यांनी थोडं शहाणपण घेतलं असतं, तर ते महाराष्ट्रात परत आले नसते. ज्यांनी आमचा विश्वासघात केला, त्यांनी आम्हाला हिंदूत्व शिकवू नये", असा टोला त्यांनी गृहमंत्री अमित शाह यांना लगावला.
"अहमदशाहची राजकीय ताकद हादरली" :“पण ते परत का आले? महाराष्ट्रातील जनतेनं दिलेला फटका त्यांच्या पचनी पडला नाही. हे पाहण्यासाठी ते आले होते का? अहमदशाह अब्दालीचे एक राजकीय वंशज पुण्यात आले. ते अहमद शाह होते आणि हे अमित शाह आहेत. अहमद शाहची राजकीय ताकद इथे हादरली. नवाझ शरीफ यांचा केक खाणाऱ्यांकडून हिंदू धर्म आम्ही का शिकायचा? शिवसेनेनं हिंदू धर्म सोडला, असा ते वारंवार आरोप करतात. आम्ही कधीही हिंदू धर्म सोडलेला नाही, सोडणार नाही. शंकराचार्यांनी म्हटल्याप्रमाणे देशद्रोही हिंदू असू शकत नाही. तुम्ही आमचा विश्वासघात केला आहे," असा टोला त्यांनी उद्धव ठाकरेंनी लगावाला.