छत्रपती संभाजीनगर Amit Shah Maharashtra Visit : अखेर महायुतीत सकारात्मक चर्चा झाल्याची पुष्टि तिन्ही पक्षातील नेत्यांनी दिली. हॉटेल रामा इथं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत चर्चा झाल्यावर विमानतळावर लवकरच निर्णय कळेल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. "सुरुवातीपासूनच चर्चा सकारात्मक आहे. लवकरच निर्णय होईल, जे होईल ते समन्वयानं, संमतीनं होईल. लवकरच निर्णय तुम्हाला निर्णय कळेल," असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. मात्र 'दादां'ची मनधरणी हा बैठकीचा मुख्य उद्देश असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू होती. तर "चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्याला फाशी द्या, म्हणणारे विरोधक आज आरोपीची बाजू घेत आहेत. जनता त्यांचा हिशोब करेल," असा हल्लाबोल देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला.
अमित शाह यांच्या उपस्थितीत बैठक :केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या जागावाटपाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह तिन्ही पक्षातील नेत्यांची बैठक पार पडली. रात्री दहा ते एक वाजेपर्यंत असे जवळपास तीन तास चर्चा रंगली. त्यात भाजपा नेते रावसाहेब दानवे सर्वात आधी बाहेर पडले. मात्र नंतर दोन तास चर्चा झाली. छावणीचे स्वरुप प्राप्त झालेल्या हॉटेलमध्ये नेमकी काय चर्चा झाली, याची उत्सुकता होती. मध्यरात्री एक वाजता बैठक संपली आणि एक मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्र्यांच्या गाड्यांचा ताफा विमानतळाकडं निघाला. मात्र नेमका निर्णय काय झाला, याबाबत एकच उत्तर मिळालं, "चर्चा सकारात्मक, निर्णय लवकरच जाहीर करू."
अमित शाहांबरोबर बैठक जागा वाटपाची की 'दादां'च्या मनाधरणीची ? शेवटी ठरलेले उत्तर देत नेते परतले (Reporter) अजित पवार नाराज असल्याची चर्चा :राज्याच्या दृष्टीनं महत्त्वाची असलेली महायुतीची बैठक पार पडली. यात नेमका निकाल काय, याबाबत कोणत्याही नेत्यानं माहिती दिली नसली, तरी या बैठकीत उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी नेते अजित पवार यांची नाराजी दूर करण्याचा एक प्रयत्न असल्याची चर्चा रंगली आहे. जागा वाटपात अजित पवार गट राष्ट्रवादी पक्षाला लागणाऱ्या जागेबाबत अनेक वाद होण्याची शक्यता लक्षात घेता, अनेक कार्यकर्ते शरद पवार यांच्याकडं स्वगृही जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे अजित पवार नाराज असून महायुतीतून बाहेर पडण्याचा निर्णय त्यांनी घेऊ नये, यासाठी मनधरणी करण्यासाठी देखील ही बैठक असल्याची कुजबुज रंगली. मात्र याबाबत स्पष्टता कोणीही दिलेली नसल्यानं जागावाटप चर्चा की 'दादाची मनधरणी' अशी चर्चा बैठकीच्या ठिकाणी रंगली होती.
अत्याचार करणाऱ्याची बाजू घेणाऱ्याविरोधकांना जनता उत्तर देईल :"चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्याला फाशी द्या, असं म्हणत आंदोलन करणारे विरोधक आज आरोपीची बाजू घेत आहेत. जनता उघड्या डोळ्यानं पाहत आहे, मढ्याच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा हा प्रकार आहे. म्हणून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. लाडकी बहीण योजनेमुळे त्यांची झोप उडवली आहे. संवेदनशिल प्रकरणात आरोप करणं त्याला जनता उत्तर देईल. यांची जागा दाखवेल. विरोधकांची दुटप्पी भूमिका आहे, ताबडतोब फाशी द्या, शासन करा असं म्हणत होते. आता फक्त राजकारण करत आहेत. महाराष्ट्राची जनता सुज्ञ आहे, ती बरोबर हिशोब करेल," अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
हेही वाचा :
- Ajit Pawar Amit Shah Meeting : अजित पवारांनी घेतली अमित शाहंची भेट, तासभर चर्चा झाली
- Lok Sabha Elections 2024: कोणता झेंडा घेवू हाती? राज ठाकरे-अमित शाह भेटीनंतर भिवंडी लोकसभा मतदारसंघातील मनसैनिक संभ्रमात
- Karnataka Maharashtra Border dispute: अमित शाहांसोबतच्या बैठकीवर बहिष्कार टाका.. कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांकडे मागणी