करवीर निवासिनी अंबाबाईच्या उत्सवमूर्तीची झीज कोल्हापूर Ambabai Statue Issue : करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या उत्सवमूर्तीची झीज झाल्याचा अहवाल केंद्रीय पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केल्यानंतर कोल्हापूरच्या जिल्हा व सत्र न्यायालयाला दिलाय. उत्सवमूर्तीचं तातडीनं संवर्धन होणं गरजेचं असल्याचं अहवालात नमूद करण्यात आलंय. उत्सवमूर्तीची हनुवटी, नाक, ओठ या भागांवर रासायनिक प्रक्रिया केल्यानं तडे गेले आहेत. उत्सवमूर्तीला धोका निर्माण होऊ नये, यासाठी पुरातत्व विभागाच्या नियम आणि अटीनुसार तातडीनं संवर्धन करण्याची गरज असल्याचंही अहवालात स्पष्ट करण्यात आलंय.
अहवाल न्यायालयात सादर : सन 2015 साली झालेल्या रासायनिक संवर्धनातील वापरलेल्या साहित्याला तडे गेले आहेत. देवीचं नाक, ओठ, हनुवटी या सगळ्यावर हे तडे गेले असून तातडीनं संवर्धन गरजेचं असल्याचा अहवाल येथील दिवाणी न्यायालयात सादर करण्यात आल्याची माहिती श्रीपूजक गजानन मुनीश्वर यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिलीय. देवीच्या मूर्ती संवर्धनासंदर्भात दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर, कोल्हापूर यांच्यासमोर दावा सुरु आहे. या दाव्यात वादी श्रीपूजक गजानन मुनीश्वर आणि इतरांनी पुरातत्वच्या निवृत्त अधिकाऱ्यांकडून मूर्तीची पाहणी व्हावी, अशी मागणी केली होती. त्यानुसार गेल्या महिन्यात 14 व 15 मार्च रोजी मूर्तीची पाहणी झाली. पुरातत्त्व खात्याचे निवृत्त अधिकारी आर एस त्र्यंबके आणि विलास मांगीराज यांनी केलेल्या पाहणीचा अहवाल 4 एप्रिल रोजी न्यायालयात सादर झाला.
अहवालात नेमकं काय सांगितलं : आठ पानाच्या या अहवालात त्यांनी मूर्तीची गळ्या खालच्या भागाची झीज झाली असून, ती झीज सन 2015 साली झालेल्या रासायनिक संवर्धनातील अवशेषांची आहे. देवीचे नाक, ओठ, हनुवटी या सगळ्यावर तडे गेले असून, ते तडे या 2015 साली झालेल्या रासायनिक संवर्धनात वापरलेल्या साहित्याला गेलेले आहेत. तरी चेहरा आणि किरीट या भागाचं तातडीनं संवर्धन गरजेचं आहे. या संवर्धन प्रक्रियेत वापरलेलं साहित्य मूळ पाषाणाशी जुळवून घेऊ न शकल्यानं त्याचे तडे जाऊन थर निघत असल्याचं तसंच अन्य ठिकाणच्या लेपाला देखील तडे असल्याचं निरीक्षण तज्ञांनी नोंदवलंय.
उपाय काय : "यावर उपाय म्हणून मूर्ती भक्कम करण्यासाठी सिलिकेटचं द्रव्य वापरुन हे तडे बुजवता येतील. तसंच मूर्तीला जुळवून न घेणारे जुन्या संवर्धन प्रक्रियेतील साहित्याचे सगळे थर रासायनिक संवर्धन प्रक्रियेनं काढून नव्यानं थर द्यावे लागतील. अखेरीस रंगविरहित संरक्षक द्रव्याचा थर देऊन मूर्ती सुरक्षित करावी लागेल," असा सल्ला दिलाय. त्याचबरोबर वेळोवेळी मूर्तीचं निरीक्षण करुन योग्य ती काळजी घेणं. मूर्तीला स्नान न घालता नाजूक सूती कापडानं पुसून घेणं, मूळ मूर्तीला पुष्पहार वगैरे न घालता केवळ उत्सव मूर्तीला फुलांचे हार घालणं. गर्भगृहातील संगमरवर काढणं, कीटकांचा उपद्रव होऊ नये, यासाठी योग्य ती उपाययोजना करणं. तसंच आर्द्रता आणि तापमान यांचं नियंत्रण करणं, अलंकार आणि किरीट घालताना योग्य ती काळजी घ्यावी, अशा प्रकारच्या सूचना देखील केलेल्या आहेत.
हेही वाचा :
- दिगंबराच्या जयघोषात दुमदुमली नृसिंहवाडी, पहा व्हिडिओ
- कोल्हापूर शहर हादरलं; एकाच दिवशी तीन जणांची हत्या? - Kolhapur Muder News