अमरावती Amravati Police Recruitment 2024 :राज्यभर आजपासून पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात झाली असून ही भरती प्रक्रिया सोपी आणि सुकर व्हावी यासाठी अमरावती ग्रामीण पोलिसांच्या वतीनं 'आरएफआयडी' म्हणजेच रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. या प्रणालीमुळं भरती प्रक्रियेला गती येईल तसेच पारदर्शकता योग्यपणे बाळगता येईल, असा दुहेरी उद्देश असल्याचं अमरावतीचे पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना म्हटलं आहे. अमरावती ग्रामीण मध्ये 207 जागांसाठी 27 हजार 981 जणांनी अर्ज केले आहेत. जोग स्टेडियम या ठिकाणी या उमेदवारांची शारीरिक चाचणी घेतली जात आहे.
अशी आहे आरएफआयडी प्रणाली : रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन या तंत्रज्ञानात रेडिओ लहरींचा वापर टॅग केलेल्या ऑब्जेक्टला ओळखण्यासाठी केला जातो. पोलीस भरती प्रक्रियेत आरएफआयडी अँक्लेट उमेदवारांच्या पायाला बांधल्या जातो. उमेदवार मैदानावर उतरल्यापासून मैदानाबाहेर निघेपर्यंत ते त्याच्या पायाला बांधलेलं राहणार आहे. यामध्ये लागलेले सेंसर हे उमेदवार धावायला लागल्यापासून ते त्यानं आपलं धावणं थांबवण्यापर्यंत त्याचा वेग आणि वेळ आपोआप दर्शवतो. शंभर किंवा सोळाशे मीटर धावल्यावर उमेदवारानं निश्चित केलेलं अंतर पार करताच ही प्रणाली आपोआप थांबते. या उपकरणामधील संपूर्ण डाटा संगणकामध्ये सेव्ह राहत असून संपूर्ण भरती प्रक्रिया आटोपल्यावर प्रत्येक उमेदवाराचा योग्य निकाल स्पष्ट होतो, असं देखील पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी स्पष्ट केलं.