अमरावती Agriculture News :कृषी क्षेत्रात सातत्यानं नवनवीन बदल होत आहेत. अनेक शेतकरी चांगलं उत्पन्न मिळवण्यासाठी आपल्या शेतात नवनवीन प्रयोग करत आहेत. असाच प्रयोग अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यात येणाऱ्या केकतपूर येथील शेतकऱ्यानं केलाय. या शेतकऱ्यानं नेमका काय जुगाड केलाय जाणून घेऊया.
"शेती करून काही फायदा नाही. चांगले पैसे मिळत असेल तर विकून टाक. मोकळा हो, असा अनेकांनी सल्ला दिला. मात्र, चाळीस वर्षांपूर्वी घेतलेल्या शेतात गेल्या चार-पाच वर्षात प्रचंड मेहनत घेतली. शेतातून नाल्यात वाहून जाणारी लांब मोठी चर खोदून शेतातच पाणी मुरविण्याचा प्रयोग केला. विशेष म्हणजे ज्या ठिकाणी मोठी चर खोदली त्या ठिकाणी विशिष्ट अंतरावर आजूबाजूनं आंब्याची 50 झाडं लावली. चरात साठणारं पाणी आंब्याच्या रोपांसोबत शेतातील इतर पिकांनादेखील मिळतं. गेल्या दोन-तीन महिन्यांपासून शेतात घेतलेली मेहनत निश्चितच फायदेशीर ठरणार आहे," असा विश्वास केकतपूर येथील शेतकरी आणि अमरावती शहराचे माजी महापौर अशोक डोंगरे यांनी व्यक्त केला.
दोन शेतांच्या मधात खोदली चर : केकतपूर परिसरात अशोक डोंगरे यांची आठ एकर शेत जमीन आहे. आठपैकी चार-चार अशा दोन भागात ही जमीन विभक्त करण्यात आली आहे त्याच्या मध्यभागी पाच फूट अंतराची मोठी चर खोदली. यासोबत तेथील गवत काढून हा भाग स्वच्छ केला. या चरात आंब्याची एकूण 50 झाडं काही अंतरावर एकमेकांच्या विरुद्ध दिशेनं लावण्यात आली. झाडे लावलेल्या ठिकाणी विशिष्ट अशा मजबूत अडीच फुटाच्या एकूण 50 प्लेट्स लावण्यात आल्या आहेत. या प्लेट्सचा अर्धा फूट भाग हा जमिनीत खोल गाडण्यात आला. या प्लेट्समुळेमधून वाहून जाणाऱ्या पाण्याला अडथळा निर्माण होऊन हे पाणी अडून जमिनीत मुरते.
इतर पिकांनाही फायदा : "प्लेट्स चरात विशिष्ट अंतरावर लावण्यात आल्यामुळे वाहणारं पाणी अडवण्यास मदत होईल. आंब्याच्या झाडांना मुबलक पाण्यासाठी मिळणार आहे. शेताच्या बांधावर असणारी तूर आणि सोयाबीन यांनादेखील पाणी मिळणार आहे. या प्रयोगाचे खास वैशिष्ट्य म्हणजे शेतात लावलेल्या आंब्याच्या झाडांची काळजी केवळ मार्च, एप्रिल आणि मे असे तीन महिनेच घ्यावी लागणारे आहे," असे अशोक डोंगरे यांनी सांगितलं.