महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरण ; पोलिसांवर गुन्हा दाखल करा, वकिलांची मागणी, म्हणाले "अक्षय जिवंत असता, तर . ." - AKSHAY SHINDE ENCOUNTER CASE

अक्षय शिंदेच्या एन्काऊंटर प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयानं पोलिसांना जबाबदार धरलंय. मात्र, त्यांच्याविरोधात अद्यापही गुन्हा दाखल झालेला नाही.

Akshay Shinde Encounter Case adv Amit Katranware demands filing of case against five five police
अक्षय शिंदे, वकील अमित कटारनवरे (ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 24, 2025, 7:39 AM IST

ठाणे : बदलापूरमधील शाळेतील अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार (badlapur sexual assault case) केल्या प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे (Akshay Shinde Encounter Case) याचा ठाणे कारागृहात नेत असताना पोलिसांनी एन्काउंटर केला. मात्र, हा एन्काउंटर फेक असल्याचा निष्कर्ष काढत या प्रकरणाला पाच पोलीस जबाबदार असल्याचा अहवाल चौकशी समितीनं दिला. या पाच पोलिसांविरुद्ध गुन्हा दाखल करुन कारवाई करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि नीला गोखले यांच्या खंडपीठानं दिले. मात्र, निर्देश देऊनही अद्याप गुन्हा दाखल न झाल्यानं अक्षय शिंदे याच्या वकिलानं गुरुवारी (23 जाने.) मुंब्रा पोलीस ठाण्यात जाऊन पाच पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

पोलीस ठाण्यातकाय म्हणालेअक्षय शिंदेचे वकील ? :अक्षय शिंदेचे वकील अमित कटारनवरे यांनी मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्याशी संवाद साधला. यावेळी बोलत असताना अक्षय शिंदेची हत्या राजकीय फायद्यासाठी करण्यात आल्याचा आरोप अमित कटारनवरे यांनी केला. तसंच आत्मसंरक्षणासाठी गोळी झाडल्याची कबुली पोलिसांनी दिली. मात्र, हिसकावून घेतलेल्या पिस्तुलावर अक्षय शिंदेच्या बोटांचे ठसे नाहीत. तसंच अक्षय शिंदे याच्या शरीरावर आणि शर्टवर गन पावडरही नव्हती, असंही त्यांनी सांगितलं. पुढं पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यासाठी अक्षय शिंदेचे कुटुंबीय का आले नाहीत? असा सवाल पोलिसांनी कटारनवरे यांना विचारला. त्यावर त्यांनी अक्षय शिंदेच्या कुटुंबीयांची कॉल रेकॉर्डिंग पोलिसांना ऐकवली. तसंच अक्षय शिंदेच्या वडिलांना धमकीचे फोन येत असून त्यांना राजकीय नेते त्रास देत असल्याचंही यावेळी अमित कटारनवरे म्हणाले. मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणाले की, "आम्ही गुन्हा दाखल करू. पण, तत्पूर्वी सीआयडीकडील अहवाल तपासून मग कारवाई करू."

वकील अमित कटारनवरे यांची प्रतिक्रिया (ETV Bharat Reporter)

...तर सत्य बाहेर आलं असतं : पोलीस ठाण्यातून बाहेर आल्यानंतर अमित कटारनवरे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. अक्षय शिंदे याचं एन्काऊंटर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करण्यात आल्याचा आरोप कटारनवरे यांनी केला. तसंच ते म्हणाले, "या प्रकरणात अक्षय शिंदेला ठार करण्याची एवढी घाई का केली? जर अक्षय शिंदे हा जिवंत असता, तर निश्चितच सत्य बाहेर आलं असतं. त्यामुळंच पोलिसांना हाताशी धरुन ताबडतोब पोलीस चकमक घडवून लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्याचे पुरावे मिटवण्यात आले." यावेळी त्यांनी अक्षय शिंदेला नराधम म्हणणाऱ्या योगेश कदम आणि संजय शिरसाट यांनाही धारेवर धरलं.

देवेंद्र फडणवीसांकडं समान न्यायाची अपेक्षा :पुढं ते म्हणाले की, "अक्षय शिंदेच्या कुटुंबीयांना धमकावण्यात येतंय. सत्य दडपण्याचा प्रयत्न होतोय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आम्हाला अपेक्षा आहेत. ते वकील आहेत. न्यायालयाच्या निर्देशांची त्यांना जाणीव आहे. इतर मंत्र्यांना कायद्याची किती माहिती आहे माहीत नाही. अक्षय शिंदेच्या कुटुंबीयांचं बदलापूरमध्ये राहणं कठीण झालंय. पण शिंदे कुटुंबीय कष्टकरी आहे. तेव्हा त्यांचं संरक्षण पोलिसांद्वारे करणं गरजेचं आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानं शिंदे कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. जर अडचण निर्माण केली. तर निश्चितच लोकशाही धोक्यात आहे."


हे ही वाचा -

  1. अक्षय शिंदेच्या घरावर खासगी बँकेची नोटीस; काय आहे नेमकं प्रकरण?
  2. अक्षय शिंदे एन्काउन्टर प्रकरणात पाच पोलिसांवर दाखल होणार गुन्हा, चौकशी अहवाल न्यायालयात सादर
  3. अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरण : बदलापूर तपास हलक्यात घेणं भोवलं, उच्च न्यायालयाचे सीआयडीवर ताशेरे

ABOUT THE AUTHOR

...view details