बारामती : ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे नातू आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुतणे युगेंद्र पवार यांनी आज बुधवार (दि. 21 फेब्रुवारी) रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाच्या पक्ष कार्यालयाला भेट दिली. राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर अनेक घडामोडी आपण बघत आहोत. त्यातच नुकतेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कुटुंबात मला एकटं पाडलं जात असल्याचं म्हटलं होतं. त्याची चर्चा सुरू असतानाच युगेंद्र पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यालयाला भेट दिली. यावेळी बोलताना आगामी लोकसभा निवडणुकीत ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या सूचनेनुसार काम करणार असल्याचं युगेंद्र पवार यांनी यावेळी सांगितलं.
माझे आई-वडीलही मला पाठिंबा देतील : लोकसभा निवडणुकीमध्ये खासदार सुप्रिया सुळे विरुद्ध उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यात लढत होण्याची चर्चा आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी युगेंद्र पवार यांच्या राजकीय प्रवेशाचं स्वागत केलं आहे. यावर बोलताना युगेंद्र पवार म्हणाले, "ज्येष्ठ नेत्यांनी याबद्दल आनंद व्यक्त केल्यानं मलाही याचा आनंदच आहे. तसंच, माझ्या भूमिकेला माझे आई-वडीलही मला पाठिंबा देतील."
कुस्तीगीर संघाच्या वतीने कुस्त्यांचं आयोजन : युगेंद्र पवार हे जलसंधारण, ओढा खोलीकरण, पर्यावरण समृद्ध राहण्यासाठी दरवर्षी पावसाळ्यात सीडबॉल निर्मितीच्या उपक्रमात योगदान देतात. अनेक अल्पभूधारक शेतकऱ्यांना विहिरी खोदून दिल्या आहेत. युगेंद्र पवार हे राजकारणात सक्रिय नव्हते. मात्र, राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर बारामतीमध्ये शरद पवार यांच्या गटाला कार्यकर्ते आहेत की नाही, असा सवाल उपस्थित झाला. त्याचवेळी पहिल्यांदा त्यांनी बारामती तालुका कुस्तीगीर संघाच्या वतीनं कुस्त्यांचं आयोजन करून शरद पवार यांना निमंत्रित केलं होतं.
''अद्याप सक्रिय राजकारणात नाही'' : मी सध्या संपूर्णपणे राजकारणात सक्रिय व्हायचा निर्णय घेतलेला नाही. मी व्यावसायिक आहे. मी यापूर्वी मुंबईत कार्यरत होतो. सध्या पुण्यात कार्य करतो. काही वर्ष पुण्यात शिक्षण घेतलं आहे. त्यानंतर दोन-तीन वर्ष युरोपला होतो. अमेरिकेत गेली सात-आठ वर्ष काम करीत होतो. मी पुन्हा भारतात येईल, असं वाटत नव्हतं. पण मी पुन्हा भारतात परतलो. कुटुंबाचा व्यवसाय पहायला सुरुवात केली. चार वर्षांपूर्वी शरद पवार साहेब यांनी विद्या प्रतिष्ठान संस्थेवर माझी निवड केली. त्यामुळे राजकारण आणि व्यवसाय या दोन्ही गोष्टी घरातूनच मला मिळाल्या आहेत," अशी भावना त्यांनी व्यक्त केली.