मुंबई :राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेमुळं राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. तसंच वाय दर्जाची सुरक्षा असतानाही सिद्दीकींवर तीन जणांंनी हल्ला केला. त्यामुळं विरोधी पक्षांच्या नेत्यांकडून अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
हत्येचं कारण काय? : बाबा सिद्दीकी हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते होते. तसंच ते आमदार झिशान सिद्दीकी यांचे पिता होते. आमदार झिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाबाहेरच तीन अज्ञात हल्लेखोरांकडून त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. यात त्यांना तीन गोळ्या लागल्या. एक गोळी छातीत लागली. तर त्यांच्या सहकाऱ्याच्या पायालादेखील एक गोळी लागली. जखमी अवस्थेत बाबा सिद्दीकी यांना लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. हल्लेखोर अज्ञात आहेत.
अजित पवार काय म्हणाले? :"राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी राज्यमंत्री, विधिमंडळात प्रदीर्घकाळ राहिलेले माझे सहकारी बाबा सिद्दीकी यांच्यावर झालेल्या गोळीबाराची घटना अत्यंत दुर्दैवी निषेधार्ह आणि वेदनादायी आहे. या घटनेत त्यांचं निधन झाल्याचं ऐकून मला धक्का बसला. मी माझा चांगला सहकारी, मित्र गमावलाय. या भ्याड हल्ल्याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो," अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सिद्दीकी यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करून श्रद्धांजली वाहिली. "या घटनेची सखोल चौकशी करुन हल्लेखोरांवर कडक कारवाई करण्यात येईल. हल्ल्यामागच्या सूत्रधारही शोधण्यात येईल. बाबा सिद्दीकी यांच्या निधनामुळं अल्पसंख्यांक बांधवांसाठी लढणारा, सर्वधर्मसमभावासाठी प्रयत्न करणारा एक चांगला नेता आपण गमावलाय. त्यांचे निधन हे राष्ट्रवादी काँग्रेसचं मोठं नुकसान आहे. झिशान सिद्दीकी, सिद्दीकी कुटुंबीय आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या दुःखात मी सहभागी आहे," असंही पवार आपल्या शोकसंदेशात म्हटले आहेत.
बाबा सिद्दीकींवर झालेला गोळीबार खेदजनक :या घटनेनंतर एक्सवर पोस्ट करत राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले की, "राज्याची कोलमडलेली कायदा सुव्यवस्था चिंता वाढवणारी आहे. देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईत माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकी यांच्यावर झालेला गोळीबार खेदजनक आहे. गृहमंत्री आणि सत्ताधारी इतक्या सौम्यतेनं राज्याचा गाडा हाकणार असतील तर ही सामान्य जनतेसाठी धोक्याची घंटा ठरू शकते. याची केवळ चौकशीच नको तर जबाबदारी स्वीकारुन सत्ताधाऱ्यांनी आपल्या पदावरून पायउतार होण्याची गरज आहे. बाबा सिद्दीकी यांच्याप्रती भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांप्रती सहवेदना व्यक्त करतो."
जयंत पाटलांची सत्ताधाऱ्यांवर टीका :या घटनेवरुन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले, "माझे मित्र मंत्री बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. ही आपल्या महाराष्ट्रासाठी फार धक्कादायक आणि लाजिरवाणी बाब आहे. याआधी भाजपाच्या आमदारानं पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार केला होता. माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची फेसबुक लाईव्ह करून हत्या करण्यात आली होती. आता बाबा सिद्दीकी यांची हत्या."