पुणे: राज्यात आणि पुणे शहरात मोठ्या प्रमाणावर नागरिकांकडून वाहतुकीचे नियम पळताना दिसून येत नाहीत. या वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या लोकांमुळं वाहतूक कोंडी होते. वाहतुकीचे नियम सर्वांनी पाळावे तसेच जे लोक वाहतुकीचे नियम पाळणार नाहीत, अश्या लोकांना आता पाच हजार रुपये दंड करण्याचा सरकारचा विचार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिली. अजित पवार आज पुणे दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी बेशिस्त वाहन चालकांवर कठोर कारवाईचे संकेत दिले.
५ हजार रुपये लावणार दंड : "दोन दिवसांपूर्वी पुण्यातील सर्किट हाऊस येथे सर्वच अधिकाऱ्यांची बैठक झाली आहे. ही बैठक वाहतुकीच्या संदर्भात होती. अनेक वेळा लोकांकडून वाहतुकीचे नियम पाळले जात नाहीत. अश्या लोकांना दंड जास्त लावला पाहिजे, असं काहींनी लक्षात आणून दिलं. लोकसभेत याबाबत देखील चर्चा झाली. जर ५ हजार दंड लावला तर लोकांना शिस्त लागेल. पण याला कायदा हा सेंट्रल गव्हर्मेंटचा लागतो. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची ही मानसिकता आहे. वाहतूक कोंडी सुरळीत होण्यासाठी अनेक टोल हे काढले आहेत. तर काही टोल हे पुढच्या काळात काढले देखील जाणार आहे," असं अजित पवार म्हणाले.