पुणेPune Porsche Accident Case : पुणे अपघात प्रकरणी रक्ताच्या नमुन्यात फेरफार केल्याप्रकरणी राज्य सरकारनं कारवाईला सुरवात केलीय. आरोपीच्या रक्ताचे नमुने कचऱ्यात फेकून देणारे डॉ. अजय तावरे तसंच डॉ. श्रीहरी हाळनोर यांना निलंबित करण्यात आलं आहे. शिवाय बीजे मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळे यांनाही तत्काळ सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं आहे. त्यांच्या जागी अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, बारामतीचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के यांच्याकडं अतिरिक्त पदभार सोपवण्यात आलाय.
दोषींना धडा शिकवणार : ससून रुग्णालयातील रक्ताच्या नमुन्यात हेराफेरी केल्याप्रकरणी नेमलेल्या समितीचा अहवाल आलाय. यातील काही प्राध्यपाकांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं आहे. ही गंभीर बाब असून त्यांच्यावर कारवाई सुरुच आहे. यापुढं कोणत्याही सरकारी रुग्णालयात, असा प्रकार होणार नाही याची काळजी घेतली जाईल. दोषी असलेल्यांवर कडक कारवाई केली जाईल. या संपूर्ण प्रकरणाची दखल आम्ही घेतली आहे. या प्रकरणात संपूर्ण चौकशी करून दोषींना धडा शिकवला जात नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही. डॉ. अजय तावरे तसंच डॉ. श्रीहरी हाळनोर या दोघांनाही निलंबित करण्यात आलं आहे. या घटनेची मला 26 तारखेला माहिती मिळालीय. त्याचवेळी मी म्हणालो की, रक्ताचा नमुना बदलणं, ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. लोकांचा आमच्यावर विश्वास आहे. यापुढं अशा घटना घडू नयेत, अशा सूचनाही मी दिल्याचं वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटलंय.