नवी दिल्लीBill To Amend Waqf Act : ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन" (एआयएमआयएम) प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी रविवारी मालमत्तांवरील वक्फ बोर्डाचे अधिकार कमी करण्यासाठी विधेयक आणण्याच्या केंद्राच्या योजनेवर प्रतिक्रिया दिली. पक्षाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर ओवैसी यांचा एक व्हिडिओ पोस्ट केला. यामध्ये त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला.
विधेयक धार्मिक स्वातंत्र्याच्या विरोधात :खासदार असदुद्दीन ओवैसी म्हणाले की, "संसदेचे अधिवेशन सुरू असताना केंद्र सरकार संसदीय वर्चस्व आणि विशेषाधिकारांच्या विरोधात काम करत आहे. सरकार मीडियाला माहिती देत आहे. परंतु संसदेला माहिती देत नाही. या प्रस्तावित दुरुस्तीबाबत मीडियामधील वृत्त पाहता मोदी सरकार वक्फ बोर्डाची स्वायत्तता हिरावून घेऊ इच्छित आहे. त्यात हस्तक्षेप करू इच्छित आहे, हे दिसून येते. हे विधेयक धार्मिक स्वातंत्र्याच्या विरोधात आहे."
भाजपा वक्फ मालमत्तेच्या विरोधात : खासदार असदुद्दीन ओवैसी म्हणाले, "दुसरी गोष्ट म्हणजे भाजपा सुरुवातीपासूनच वक्फ बोर्ड आणि मालमत्तांच्या विरोधात आहे. हा त्यांचा हिंदुत्वाचा अजेंडा आहे. आता त्यांना वक्फची स्थापना आणि रचनेत सुधारणा करायची आहे. मात्र, तसं केल्यास प्रशासकीय अराजकता येईल. यासह वक्फ बोर्डाची स्वायत्तता संपुष्टात येईल. बोर्डावर सरकारचं नियंत्रण वाढलं तर वक्फच्या स्वातंत्र्यावर परिणाम होईल."