महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वाहतूक सुरू होण्याआधीच पुलाला गेले तडे, सामाजिक कार्यकर्त्यानं काय दिला इशारा? - AHILYANAGAR ROAD ISSUES

अहिल्यानगरमधील पुलाच्या निकृष्ट बांधकामामुळे अपघात होण्याची भीती आहे. याकडं लक्ष वेधत सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी संबंधितावर कारवाईची मागणी केली आहे.

Ahilyanagar road issues
पुलाचं निकृष्ट बांधकाम (Source- ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 28, 2025, 8:27 AM IST

Updated : Jan 28, 2025, 10:12 AM IST

शिर्डी (अहिल्यानगर) - देशात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या रस्ते वाहतूक खात्याचं आणि खात्याकडून करण्यात आलेल्या महामार्गाचं कौतुक केलं जातं. मात्र, अहिल्यानगर जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग 160 वरील कामांचा दर्जा निकृष्ट आहे. रस्त्याचं आणि त्यावरील पुलाचं काम अपुरं आहे. मात्र, वाहतूक सुरू होण्याआधीच पुलाला तडे गेल्यानं हेच का ते मंत्रालय? असा प्रश्व पडल्याशिवाय राहत नाही.

साईभक्तांच्या सोयी सुविधांसाठी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 160 चं काम सुरू आहे. त्यात जुना नगर-मनमाड महामार्ग आणि शिर्डी-मुंबई महामार्गवरील सावळीविहीर येथील टी पॉंईटवर उड्डाणपलाचे काम सुरू होतं. मात्र, गेल्या चार वर्षापासून कोपरगावच्या दिशेनं पुलाचं काम करताना भराव टाकण्यात आला. मात्र, शिर्डीकडं उतरण्याची सोय अद्याप करण्यात आलेली नाही.

निकृष्ट बांधकाम प्रकरणात न्यायालयात जाणार (Source- ETV Bharat Reporter)

निकृष्ट बांधकामाला जबाबदार असणारे कंत्राटदार, सुपरवायझर, अधिकारी आणि कार्यकारी अभियंता यांच्यावर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करावेत. असे सदोष पूल बांधून त्यांनी जीवितहानी करू नये, एवढीच अपेक्षा आहे-माहिती अधिकार कार्यकर्ते, संजय काळे

अपूर्ण काम असताना टोलवसुली-अपूर्ण काम झालेल्या पुलावर वाहतुक सुरू होण्याआधीच तेथील डांबरी रस्त्याला तब्बल दोन फुट खोलीचे तडे गेले आहेत. राष्ट्रीय महामार्ग 160 हा ठाणे ते कर्नाटक हद्दीतपर्यंत नव्यानं सुरू करण्यात आलाय. दोन राज्यांना जोडण्याबरोबर मालेगाव ते दौंड दरम्यानचा महामार्ग देशाच्या उत्तर आणि दक्षिण भागालाही जोडतो. याचबरोबरीनं देशभरातून शिर्डीला येणाऱ्या साईभक्तांनाही हा मार्ग सोयीचा आहे. मात्र, या महामार्गावरील सिन्नर ते अहिल्यानगर जिल्ह्यातील सावळीविहीरपर्यंत रस्त्याचं काम अपूर्ण असतानाच जोरात टोलवसुलीही सुरू करण्यात आली आहे.

पूल कोसळण्याची भीती-माहिती अधिकार कार्यकर्ते संजय काळे म्हणाले, "चार वर्षांपासून महामार्गाचं नुतनीकरण करण्याचं काम सुरू आहे. २०१८ मध्ये १६० महामार्गावर १४ कोटी ८८ लाख खर्च करून बांधण्यात आलेल्या पुलाचा सांगाडा पडून आहे. त्यावेळी काम सुरू असताना मातीच्या भराव्याला आक्षेप घेतला होता. अर्धवट पूल असताना डांबरीकरण करण्यात आलं आहे. अशा अवस्थेत पूल कोठल्याही परिस्थितीत कोसळू शकतो. याबाबतच्या तक्रारी करून कोणताही संबंधित अधिकारी दखल घेत नाही. हा राष्ट्रीय संपत्तीचा अपव्यय आहे. करदात्यांचा पैसा वाया गेला आहे. हा पूल खोदून पुन्हा काम करावे लागेल, अशी परिस्थिती आहे. या पुलाचे काम कोणत्याही कारणाशिवाय काम रखडलेले आहे. दोन वर्षापूर्वी अधिकाऱ्यांनी पत्र देऊनही काम झाले नाही. बीओटी तत्वावर पुलाचं बांधकाम करण्यात आलं."

रस्त्याची साडेसाती कधी संपेल-सावळी विहार येथे जुन्या नगर मनमाड मार्गाला हा महामार्ग जेथे छेदतो येथील उड्डाणपुलाचं काम अर्धवट स्थितीत सोडून देण्यात आलं. आता तर या पुलावरच मोठ्या भेगा पडल्या आहेत. त्यामुळे हा उड्डाण पूल सुरू केल्यास अपघातांना निमंत्रण ठरेल, अशी भीती या रस्त्याचा कामासाठी पाठपुरावा करणारे, माहिती अधिकार कार्यकर्ते संजय काळे यांनी व्यक्त केली. त्यामुळे त्यांनी मुंबई न्यायालयात जाण्याची तयारी सुरू केली आहे. जुना मनमाड महामार्ग आणि नव्यानं झालेल्या एन एच 160 चं काम हा लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतही महत्त्वाचा मुद्दा ठरला होता. मात्र निवडणुकीनंतर राजकीय नेत्यानं या कामाकडे दुर्लक्ष केल्याचं दिसून येत आहे. पाचव्यांदा कंत्राटदार बदलून पुन्हा एक महिन्यानं काम सुरू करण्यात आले. शनि शिंगणापूरला जाणाऱ्या भक्तांसाठी रस्त्याची साडेसाती कधी संपेल, असा प्रश्न सुज्ञ नागरिकांना पडला आहे.

हेही वाचा-

  1. कुणी रस्ता देता का रस्ता! रस्ता नसल्यानं चक्क बैलगाडीतून न्यावा लागला मृतदेह; स्वातंत्र्याच्या 78 वर्षानंतरही दयनीय स्थिती - Chhatrapati Sambhajinagar Road
  2. कोस्टल रोडच्या उत्तर वाहिनीचं आज लोकार्पण, उद्यापासून मुंबईकरांना प्रवास करता येणार
Last Updated : Jan 28, 2025, 10:12 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details