मुंबई Agriculture Power Plant : महाराष्ट्रातील कृषी क्षेत्रासाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरलाय. आज उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सुमारे 9 हजार मेगा वॉट सौरऊर्जेसाठी विकासकांना देकारपत्र (लेटर ऑफ अवॉर्ड) प्रदान करण्यात आले. यातून 40 हजार कोटी रुपये गुंतवणूक होणार असून, 25 हजार रोजगार निर्माण होणार आहे. यामुळं पुढच्यावर्षी 40 टक्के कृषीफिडर हे सौरऊर्जेवर येणार असून, शेतकर्यांना दिवसा वीज मिळणे शक्य होणार आहे. स्पर्धात्मक निविदा प्रक्रिया राबवून हे देकारपत्र आज सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या एका कार्यक्रमात प्रदान करण्यात आले.
महाराष्ट्राच्या कृषि जगतात आजचा दिवस सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल : राज्यातील शेतकर्यांना दिवसा वीज मिळावी यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी 2016 मध्ये मुख्यमंत्री सौरकृषी वाहिनी योजना प्रारंभ केली होती. त्यानंतरच्या काळात 2 हजार मेगा वॉटपर्यंत वीज निर्मिती करण्यात आली. आता 9 हजार मेगा वॉट सौरऊर्जा तयार करण्यात येणार आहे. त्यामुळं 40 टक्के कृषीफिडर हे सौरऊर्जेवर येतील. यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "महाराष्ट्रातील शेतकर्यांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक आहे. राज्यातील असंख्य शेतकर्यांची दिवसा वीजेची सातत्यानं मागणी होती. ही मागणी आता पूर्ण करणं शक्य होणार आहे. या कारणास्तव आजचा दिवस महाराष्ट्राच्या कृषि जगतात सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल. अतिशय कमी कालावधीत प्रकल्पासाठी जागा मिळाल्या आहेत. त्यामुळं प्रकल्पाचं कार्यान्वयन शक्य होणार आहे. सर्वांत आधी सौर ऊर्जेवरील ही संकल्पना प्रायोगिक तत्वावर अहमदनगर जिल्ह्यातील राळेगण सिद्धी इथं साकारण्यात आलीय. ती कमालीची यशस्वी झाली. आता जागा उपलब्धतेसाठी महसूल यंत्रणेनं केलेल्या भरीव कार्यामुळं हे शक्य झालं. विकासकांना यापुढेही सर्व शासकीय यंत्रणा मदत करतील. कुठेही अडचण आल्यास त्या सोडविण्यासाठी शासन कायम पाठीशी असेल."