विविध मागण्यांसाठी आदिवासी गोवारी जमातीचे नागपुरात तीव्र आंदोलन नागपूर Gond Gowari Community Agitation : महाराष्ट्रातील गोंड- गोवारी जमातीला 14 ऑगस्ट 2018 पूर्वी आणि नंतर निर्गमित करण्यात आलेल्या जात प्रमाणपत्रानुसार अनुसूचित जमातीचे सर्व लाभ देण्यात यावेत, तसंच वैधता प्रमाणपत्र देण्यात यावे, गोंड- गोवारी जात प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्राच्या आधारे पदवी आणि इतर उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या बेकायदेशीरपणे रोखून ठेवण्यात आलेल्या स्कॉलरशिप विनाविलंब देण्यात यावी आणि पदवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांच्या रोखून ठेवलेले पदवी प्रमाणपत्रे तत्काळ निर्गमीत करावे यासह अनेक मागण्यांसाठी आज (5 फेब्रुवारी) नागपूरच्या संविधान चौकात हजारोंच्या संख्येनं आदिवासी गोवारी जमातीच्या लोकांनी आंदोलन सुरू केलं आहे.
नागपुरात आंदोलन :114 हुतात्मा आदिवासींच्या सर्व आदिवासी गोंड गोवारी बांधवांना अभिवादन करून समाजातील तीन जण गेल्या 11 दिवसांपासून आमरण उपोषणावर बसले आहेत. यामध्ये किशोर चौधरी, सचिन चचाणे, आणि चंदन कोहरे यांचा समावेश आहे. समाजाच्या संविधानिक मागण्याबाबत विद्यमान राज्य शासन गंभीर नसल्याचं दिसून येत आहे. तरी आपल्या न्याय हक्कासाठी, उपोषणकर्त्यांची हिम्मत, धैर्य, शक्ती वाढविण्याकरिता लाखोंच्या संख्येनं आज आदिवासी गोवारी जमातीच्या लोक संपूर्ण कुटूंबासह संविधान चौकात दाखल झाले आहेत.
आदिवासी गोवारी समाज आक्रमक :गेल्या तीन वर्षांपासून शासनाकडून जाणीवपूर्वक महाराष्ट्रातील 'गोंड गोवारी' समाजाच्या लोकांना अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र तसंच जात वैधता प्रमाणपत्र आणि इतर सर्व लाभांपासून वंचित ठेवलं जातंय. त्यामुळं आमच्या संविधानिक हक्कांचे हनन होत असल्यानं 'गोंड गोवारी' समाजातील बांधवामध्ये असंतोषाची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळं सर्वांनी मिळून आपल्या संविधानिक न्याय मागण्यांसाठी आज विदर्भातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन केले आहे, अशी प्रतिक्रिया आंदोलनकर्त्यांपैकी एकाने दिली.
संविधानिक मार्गाने आंदोलन, मात्र सरकारचे दुर्लक्ष : गोंड गोवारी समाजाच्या मागण्या मंजूर न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा गोवारी समाजाकडून देण्यात आलाय. शासनाकडून आमच्या प्रगतीचे, सार्वजनिक जीवन जगण्याचे सर्व मार्ग बंद करण्यात आले असून संविधानीक मार्गाने गोड गोवारी समाज आपल्या घटनात्मक हक्कांसाठी लढा देत राहील, असंही आंदोलकांनी म्हटलंय.
हेही वाचा -
- जात वैधता प्रमाणपत्रासाठी आदिवासी गोवारी समाज आक्रमक; आदिवासी विकास भवनासमोर आंदोलन
- हुतात्मा गोवारी स्मृती दिवस; 29 वर्षांनंतरही गोवारी समाज लढतोय अस्तित्वाची लढाई, जाणून घ्या इतिहास
- गोवारी समाज आदिवासी नाही; न्यायालयाच्या निकालानंतर आदिवासी समाजाने केला आनंदोत्सव साजरा