पुणेRaj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तेव्हा अजित पवार यांच्यावर टीका करताना आपण अनेक वेळा पाहिलं आहे. (Raj Thackeray Pune Visit) आज ते पुणे दौऱ्यावर असताना त्यांनी पुण्यातील इतिहास संशोधन मंडळाला भेट दिली आणि तेव्हा त्यांना इतिहास संशोधन मंडळातील जुने दस्तऐवज दाखवण्यात आले. इतिहास संशोधक मंडळाचे पांडुरंग बलकवडे यांनी राज ठाकरेंना विविध मुघल राज्याचे फर्मान दाखवले. यावेळी फारुकी फर्मान बघताच त्यांनी लगेच उपमुख्यमंत्री अजित पवारांना टोला लगावला. ते म्हणाले की, ''अजित पवार जसं बोलतात तसं लिहिण्यात आलं आहे. स्वल्पविराम नाही, काही नाही.''
मंडळाला 25 लाख रुपयांचा निधी :राज ठाकरे यांनी आज भारत इतिहास संशोधन मंडळाला भेट दिली. यावेळी त्यांना मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी भेट दिलेली बाबरीची वीट इतिहास संशोधन मंडळाला भेट दिली. तसंच यावेळी त्यांनी मंडळाला 25 लाख रुपयांचा निधी देखील दिला. यावेळी भाषणात राज ठाकरे म्हणाले की, ''भारत इतिहास संशोधन मंडळात येण्याची पहिली वेळ आहे. याठिकाणी हजारो वर्षांचा इतिहास जतन केला गेला आहे. ही खूपच चांगली बाब असून बाकीकडे फक्त भूगोल आहे. इतिहास प्रत्येकानी वाचला पाहिजे. ही सगळी संस्था पाहिली आणि माझ्याकडून काही तरी करावसं वाटतं म्हणून मनसेकडून आज या संस्थेला २५ लाख रुपये देत आहे. ही संस्था मोठी झाली पाहिजे.''