पुणे Bhaiyyaji Joshi : "अयोध्येत रामलल्लाचं मंदिर उभारण्यात आलं. मात्र अद्याप काशी आणि मथुरेचं मंदिर बाकी आहे. याच मार्गानं पुढं जात काशी-मथुरेतही मंदिर उभारणीचा आमचा संकल्प आहे", असं मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय कार्यकारी मंडळाचे सदस्य भैय्याजी जोशी यांनी व्यक्त केलं. ते संघाचे प्रांत कार्यकारिणी सदस्य विनायक थोरात यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त बोलत होते.
अयोध्येतील राम मंदिर राष्ट्र मंदिर आहे : "मंदिर वही बनायेंगे'चा नारा देत रामभक्तांनी बाबरीचा ढाचा हटवला. पाचशे वर्ष हृदयाला टोचणारा काटा दूर करून आदर्शवत प्रेरणास्थान निर्माण केलं. देशात मंदिरांची कमतरता नाही, मात्र अयोध्येतील राम मंदिर सर्वार्थानं राष्ट्र मंदिर आहे. समाजाचा सामूहिक आनंद, सामूहिक शक्ती निर्माण करण्याच्या प्रयत्नाचा तो एक भाग आहे. त्या माध्यमातून देशाचं सातवं सोनेरी पान लिहिण्याचं भाग्य तुम्हा-आम्हाला मिळालं", असं भैय्याजी जोशी म्हणाले.