मुंबई Afghanistan Consulate in Mumbai : अफगाणिस्तानच्या वाणिज्यदूत जाकिया वार्दक यांनी गेल्या आठवड्यात राजीनामा दिल्यानं मुंबईतील अफगाणिस्तानचे वाणिज्यदूत कार्यालय नेतृत्वाविना निर्णायकी अवस्थेत पोहोचलंय. जाकिया यांनी राजीनामा दिल्यापासून त्या अज्ञातवासात आहेत. त्यांच्याशी संपर्क साधणं अशक्य झालंय. त्यांच्याकडं अमेरिकेचं नागरिकत्व असल्यानं त्या देशाबाहेर निघून अमेरिकेला गेल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र त्यांच्या राजीनाम्यामुळं मुंबईतील अफगाणिस्तानचे वाणिज्यदूत कार्यालय किंबहुना भारतातील अफगाणिस्तानच्या एकूणच कार्यालयांवर प्रतिकूल परिणाम झालाय.
तालिबानचा भारतात कॉन्सुलेट प्रवेश करण्याचा प्रयत्न : अफगाणिस्तानवर तालिबाननं ताबा मिळवला असला तरीही भारतात अद्याप तालिबानच्या वाणिज्यदूत कार्यालयाला व अधिकाऱ्यांना भारतीय परराष्ट्र खात्याकडून परवानगी मिळालेली नाही. त्यामुळं अजूनही भारतात अफगाणिस्तानचीच वाणिज्यदूत कार्यालये कार्यरत आहेत. मात्र सध्या मुंबईतील अफगाणिस्तान वाणिज्यदूत पदाची जबाबदारी सांभाळत असलेल्या जाकिया वार्दक या राजीनाम्यामुळं पदावरुन पायउतार झाल्यानं बदललेल्या परिस्थितीचा लाभ घेण्याचा प्रयत्न तालिबान सरकारकडून केला जात असल्याच्या घडामोडी समोर येऊ लागल्या आहेत. तालिबान आता अफगाणिस्तानऐवजी आपली वाणिज्यदूत कार्यालये व राजदूत कार्यालये सुरु करण्यासाठी युध्दपातळीवर प्रयत्न करत असल्याचं समोर येतंय, अशी माहिती सुत्रांनी दिली. मात्र अधिकृतरित्या बोलण्यास त्यांनी नकार दिला. भारतातील लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर याबाबत निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तवली जातेय.