मुंबई- Raj Nayani warns : लोकसभा निवडणुकीमध्ये विविध पक्षाकडून जोरदार जाहिरातीबाजी करण्यात येत आहे. या जाहिरातीच्या माध्यमातून विरोधकावर टीका करण्यात येत आहे. तसेच जाहिरातीत वेगवेगळ्या कलावंताना सामावून घेतलं जात आहे. दरम्यान, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या “वॉर रुकवा दी ना पापा” या जाहिरातीवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. गुरुवारी या जाहिरातीवरून चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेत यातील कलाकार पॉर्नस्टार असल्याचा आरोप केला आहे. यानंतर या जाहिरातीतील अभिनेता प्याराली उर्फ राज नयानी यांनी भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी पुढील दोन दिवसात जर माफी मागितली नाही तर त्यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा करणार असल्याचं म्हटलं आहे.
मी चरित्रवान कलावंत - प्याराली उर्फ राज नयानी
आज समाजमाध्यमावर व्हिडीओद्वारे चित्रा वाघ यांनी केलेल्या जाहिरातीवरून अभिनेता प्याराली उर्फ राज नयानी यांनी आपली भूमिका मांडली. यामध्ये आपण केलेल्या जाहिरातीवरून त्याने आक्षेप नोंदवला आहे. माझ्या चारित्र्यावर संशय घेतल्याचं तो म्हणाला. याबद्दल बोलताना अभिनेता राज नयानी म्हणाली की, चित्रा वाघ यांनी मी एक पॉर्नस्टार असल्याचे म्हटलं आहे. भाजपच्या नेत्या चित्रा वाघ या एक सुशिक्षित महिला आहेत. कलावंत जेव्हा एखाद्या सिनेमांत किंवा मालिकेत काम करतो तेव्हा त्याला त्या भूमिकेची जशी मागणी असते त्याप्रमाणे अभिनय करावा लागतो हे त्यांना माहीत असावे. आज त्यांनी माझ्या एका वेबसिरीजच्या भूमेकेतील फोटो दाखवून मी पॉर्न स्टार असल्याचा दावा केला. त्यांच्या या दाव्याची मी निंदा करतो आणि माझ्या अभिनयाला पॉर्न स्टारची उपमा दिल्याबद्दल मी आणि माझे कुटुंब खूप व्यतीत झालो आहोत, असे अभिनेता प्याराली उर्फ राज नयानी यांनी म्हटले आहे.