अहिल्यानगर- कौन बनेगा करोडपतीमधून बोलतोय तुम्हाला २५ लाखाची लॉटरी लागली आहे असं सांगून फसवणाऱ्या आरोपीस सायबर पोलिसांनी अटक केली आहे. नारायण अरुणे रा. वॉर्ड नंबर १७, लक्ष्मी माता मंदिर जवळ, रामवाडी, सर्जेपुरा, अहिल्यानगर यांना लॉटरी लागल्याचं फोन येत होते. त्यांना दिनांक २०/८/२०२१ ते दिनांक १०/३/२०२२ पर्यंत अनोळखी मोबाईल नंबर ८२९१८२२९१९, ९८६७८८२९३०, यावरुन व्हॉटसअप कॉलवरुन कॉल करुन विश्वास संपादन करुन, खोटे सांगून, वेगवेगळ्या प्रोसेसिंग फिचे नावाखाली त्यांचे फोन पे अकांऊट नंबर ७०२१२५९०१५ यावर ऑनलाईन पैसे पाठविण्यास भाग पाडलं. त्यातून एकूण तब्बल १३३२००/- रुपयाची फसवणूक केली आहे. त्यावरुन त्यांनी दिनांक १/८/२०२२ रोजी दिलेल्या फिर्यादीवरुन सायबर पोलीस स्टेशनमध्ये विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यातील आरोपीला आता पकडण्यात यश आलं आहे.
गुन्ह्याच्या तपासामध्ये आरोपीचा मोबाईल नंबर, बँक अकांऊटवरुन आरोपी फैसल इकबाल मेमन रा. मेमन मंजिल वाली पिर रोड, कल्याण ठाणे, येथे रहात असल्याचं तपासामध्ये तांत्रिक विश्लेषणाव्दारे निष्पन्न झालं. आरोपीच्या शोधार्थ वेळोवेळी कल्याण ठाणे येथे जाऊन शोध घेतला असता आरोपी सापडला नाही. त्यानंतर आरोपीचा तांत्रिक विश्लेषणाव्दारे शोध घेतला असता आरोपी दिनांक ६/१/२०२५ रोजी सापडल्यानं त्यास या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आली.