मुंबई Ashish Shelar Fake PA : आमदार आशिष शेलार यांचा स्वीय सहाय्यक आणि मंत्रालय लाईन सेक्रेटरी असल्याचं भासवून एक भामटा अनेक वकिलांकडून बंदिवान असलेल्या आरोपींची माहिती घेत होता. हा प्रकार जुलै 2023 पासून सुरू होता. आरोपींची माहिती घेवून त्यांच्या नातेवाईकांना फोन करून पैसे उकळण्याचं काम हा आरोपी करायचा. आमीर बेंद्रेकर असं आरोपीचं नाव आहे. या आरोपीला रविवारी अटक करण्यात आली असून, त्याच्यावर याआधीही आठ ते दहा गुन्हे दाखल असल्याची माहिती वांद्रे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मराठे यांनी दिली.
आशिष शेलारांच्या PA नं दिली तक्रार : आमदार आशिष शेलार यांचे खासगी स्वीय सहाय्यक नवनाथ सातपुते यांनी या प्रकरणी वांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवरून वांद्रे पोलीस ठाण्यात कलम 204, 318 (4), 319 (2) आणि 356(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. हा गुन्हा शनिवारी (24 ऑगस्ट) दाखल करण्यात आला असून, आरोपीला रविवारी नालासोपारा येथून अटक करण्यात आली.
आशिष शेलारांना दिली माहिती :वकील इरम सय्यद, रईस खान आणि आफरीन यांना जुलै 2024 पासून आतापर्यंत एका मोबाईल क्रमांकावरून कॉल येत आहेत. शर्मा अशी ओळख सांगून तो आमदार आशिष शेलार यांचा पीए तसेच मंत्रालयीन कार्यालयातील सेक्रेटरी असल्याची बतावणी करत आहे. काही आरोपींना मुक्त करण्यासाठी सरकारतर्फे योजना बनवली जात आहे. त्यासाठी हायकोर्टात प्रलंबित असलेल्या आरोपींच्या केसेसची आणि त्यांच्या नातेवाईकांची माहिती हा संबंधित शर्मा वकिलांकडं मागत आहे, अशी माहिती वकील विजेंद्र राय, वकील यास्मिन वानखेडे यांनी आशिष शेलार यांना दिली.