पुणे : ABVP Lalit Kala Kendra Clash : पुणे विद्यापीठात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि ललित कला केंद्रातील विद्यार्थ्यांमध्ये राडा झाला. विद्यापीठाच्या ललित कला केंद्रातील विद्यार्थ्यांनी नाटकाचा प्रयोग आयोजित केला होता. प्रयोग सुरू असताना, नाटकातील संवादांवर आक्षेप घेत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घालत नाटकाचा प्रयोग बंद पाडला. तसंच, नाटकात काम करणाऱ्या कलाकारांना मारहाणही केली, असा आरोप आहे. यानंतर विद्यापीठात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
'रामलीला'वरुन वाद : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्रातील विद्यार्थ्यांकडून शुक्रवारी (2 फेब्रुवारी) संध्याकाळी एका नाटकाचं आयोजन करण्यात आलं होतं. रामायणात काम करणाऱ्या कलाकारांच्या आयुष्यावर आधारित हे नाटक होतं. ''जब वी मेट'' या नाटकात रामायणात काम करणाऱ्या कलाकारांचं वैयक्तिक आयुष्य दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या नाटकामध्ये माता सीता आणि प्रभू श्रीराम यांचा अपमान केल्याचं दिसलं. याचा विरोध केल्यावर 'अभाविप'च्या कार्यकर्त्यांनी नाटकातील कलाकारांना मारहाण करण्यात आली असल्याचा आरोप संबंधित कार्यकर्त्यांनी केलाय.
मोठा पोलीस बंदोबस्त तैनात : ललित कला केंद्राचा विद्यार्थी असलेल्या भावेष राजेंद्र नावाच्या विद्यार्थ्यानं या नाटकाचं लेखन, दिग्दर्शन केलं होतं. मात्र, या नाटकातील संवादांवर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला आणि नाटकाचा प्रयोग उधळून लावला. यावेळी नाटकात काम करणाऱ्या विद्यार्थ्यांना मारहाणही करण्यात आली. त्यानंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. दरम्यान, पोलिसांकडून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, विद्यार्थी संघटना मोठ्या प्रमाणात आक्रमक झाली होती.
काय आहे नाटकात? : 'जब वी मेट' या नाटकात रामायणात काम करणाऱ्या कलाकारांचं वैयक्तिक आयुष्य दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. ललित कला केंद्राचा विद्यार्थी असलेल्या भावेष राजेंद्र नावाच्या विद्यार्थ्याने या नाटकाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. दरम्यान, नाटकांमध्ये प्रभू श्रीराम आणि सीता माता यांची भूमिका विदूषकाप्रमाणे दाखवण्यात आली. त्याचबरोबर प्रभू श्रीराम यांना राखी सावंत आणि देवी देवतांच्या पात्राच्या मुखातून शिव्या आणि आक्षेपार्ह भाषा वापरण्यात आली, असा आरोप अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून करण्यात आला आहे.