मुंबई Aaditya Thackeray On Chhatrapati Shivaji Maharaj Statue :मालवणमधील सिंधुदुर्ग राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची घटना सोमवारी (26 ऑगस्ट) दुपारी घडल्यानंतर राज्यभरातील शिवप्रेमी संतप्त झाले आहेत. तसंच या मुद्द्यावरुन विरोधक सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधत असल्याचं बघायला मिळतंय. असं असतानाच आता "मालवणमधील उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा महाराजांसारखा दिसतच नव्हता", असा गंभीर आरोप शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी केलाय. आदित्य ठाकरेंच्या या आरोपावर आता महायुतीचे नेते काय प्रतिक्रिया देतील हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
नेमकं काय म्हणाले आदित्य ठाकरे? :या संदर्भात आज (27 ऑगस्ट) मुंबईत प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना आदित्य ठाकरे म्हणाले की, "ज्या मूर्तिकारानं मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बनवला होता, त्यांना खरंच मूर्ती बनविण्याचा अनुभव होता का? कारण पुतळ्याचं प्रपोर्शन थोडं वेगळंच होतं. खरं तर तो पुतळा महाराजांसारखा वाटतंच नव्हता. मग त्या मूर्तिकाराला काम का दिले गेलं? पुतळ्याला डागडूजीची गरज का पडली? त्यावर गुन्हा दाखल झाला का? अटक करण्यात आली का?", असे अनेक प्रश्न आदित्य ठाकरेंनी उपस्थित केले.