नाशिक :केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी केली असताना देखील काही निर्यातदार आणि तस्कर एकत्रित येत बाहेर देशात छुप्या मार्गाने कांदा विक्री करत आहेत. त्याबाबतचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. यामध्ये द्राक्ष, डाळिंबाच्या बॉक्समध्ये कांदा पॅकिंग केला जात आहे. याबाबत सरकारने कांदा तस्करांवर कारवाई करावी आणि कांदा निर्यात सुरू करावी अशी मागणी केली आहे.
व्हिडिओची चौकशी करून कारवाई करावी :देशात कांद्याचा तुटवडा येऊ नये म्हणून केंद्र सरकारने गेल्या तीन महिन्यांपासून कांदा निर्यातीवर बंदी घातली आहे. त्यामुळे कांद्याचे भाव कोसळले आहेत. कांद्याचे भाव कोसळल्याने शेतकऱ्यांची वाईट स्थिती आहे. या विरोधात अनेकदा विरोधी पक्ष तसंच शेतकरी रस्त्यावर उतरले. मात्र, अद्याप यावर कुठलाही निर्णय झालेला नाही. कांदा निर्यात बंदी कायम आहे. दुसरीकडे भारताच्या सीमांवर कडेकोट बंदोबस्त असतानाही कांदा छुप्या मार्गाने दुबई, श्रीलंका, बांगलादेश, मलेशिया या भागात पाठवला जात आहे, असा आरोप 'महाराष्ट्र राज्य कांदा निर्यात संघटने'ने केला आहे.
निर्यातबंदी उठवावी : भारतात कांदा निर्यातीवर बंदी असतांनाही मोठ्या प्रमाणात छुप्या मार्गाने कांदा निर्यात होत आहे. शेतकऱ्यांना 8 ते 10 रुपये किलोने कांदा विकावा लागत आहे. हाच कांदा परदेशात 170 ते 200 रुपये किलोने विकला जात आहे. त्यामुळे यात सहभागी निर्यातदार आणि तस्करांना एका कंटेनर मागे 15 ते 16 लाख रुपये निवळ नफा मिळत आहे. त्याचा देशातील उत्पादक शेतकऱ्यांना काहीही आर्थिक फायदा होत नाही. उलट जागतिक पातळीवर देशाची बदनामी होत आहे. परदेशातील कांदा ग्राहक इतर देशातील व्यापाऱ्यांकडे जाऊ नये. तसंच, भारतीय कांद्याच्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर परिणाम होऊ नये याची काळजी केंद्र सरकार घ्यावी आणि कांदा निर्यात बंदी उठवावी अशी मागणी केली आहे.