लाठी काठी फिरवत मावळ्याचं छत्रपती संभाजी महाराजांना अनोखं अभिवादन (Etv Bharat) कोल्हापूर - महापुरुषांची जयंती साजरी करताना जीवघेणा डॉल्बीचा दणदणाट, डोळं दिपवणारी विद्युत रोषणाई, नशेत झिंगलेली तरुणाई, असं चित्र अनेक ठिकाणी पाहायला मिळतं. मात्र, कोल्हापुरातील तरुणानांनी छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी अनोखा संकल्प केला. मर्दानी खेळातील क्रीडा प्रकार असलेली लाठी काठी सलग 12 तास फिरवत येथील एका मावळ्यानं छत्रपती संभाजी महाराजांना आपल्या कृतीतून अभिवादन केलं. डॉल्बी आणि व्यसनांपासून तरुणांनी लांब राहावं, तसंच महापुरुषांचा विचार आचरणात आणावा, असा संदेश यानिमित्ताने मर्दानी खेळाडू संपत पाटील यांनी दिला.
युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्तानं गिरगाव इथल्या भैरवनाथ तालमीचे पैलवान संपत दत्तात्रय पाटील यांनी सलग 12 तास दोन्ही हातामध्ये लाठी काठी घेऊन प्रात्यक्षिके सादर केली. त्यांच्याबरोबर त्यांचा 8 वर्षांचा मुलगा दक्ष यानेही सलग 2 तास लाठी फिरवण्यामध्ये सहभाग घेतला. महापुरुषांची जयंती साजरी करण्याच्या पद्धतीवर कोल्हापुरात सोशल मीडियातून सातत्याने टीका होते. यामध्ये प्रामुख्यानं डॉल्बी आणि लेझर लाईटचा अतिरेक होत असताना जयंती साजरी करण्याचे विविध पर्याय समोर आणण्यासाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीनं सलग 12 तास लाठी काठी फिरवण्याचा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. कोल्हापुरातील पापाची तिकटी परिसरातील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारक समिती यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबवण्यात आला. संपत पाटील यांनी मंगळवारी पहाटे चार वाजल्यापासून दुपारी चार वाजेपर्यंत सलग 12 तास लाठी काठी मर्दानी खेळाचं प्रात्यक्षिक सादर केलं.
मर्दानी खेळ आणि सैनिकांची परंपरा असलेलं गिरगाव
सलग 12 तास दोन्ही हाताने काठी फिरवण्याचा विक्रम करणारे संपत पाटील हे कोल्हापूर शहरालगतच्या गिरगावातील भैरवनाथ तालमीचे खेळाडू आहेत. या गावातील स्वातंत्र्यवीर फिरंगोजी शिंदे यांनी 1857 च्या बंडात सामील होऊन इंग्रजांविरुद्ध लढा दिला होता. ब्रिटीशांनी कैदेत ठेवलेल्या चिमासाहेब महाराजांना मुक्त करण्यासाठी फिरंगोजी शिंदे यांनी सुमारे 200 गावकरी मावळ्यांसह ब्रिटीश सैन्यावर हल्ला केला. यामध्ये त्यांना वीरमरण आलं होतं. करवीर तालुक्यातील या गिरगावला सैन्य भरतीचीही मोठी परंपरा आहे. गावातील प्रत्येक घरातील एक माणूस सैन्यात असल्यानं या गावाला सैनिक गिरगाव म्हणूनही ओळखलं जातं. महापुरुषांच्या जयंतीचा बदललेला बाज पाहून व्यथीत झालेल्या संपत पाटील यांनी जयंती निमित्त मर्दानी खेळाचं प्रात्यक्षिक सादर करून नवं उदाहरण घालून दिलं.
शंभूराजांवर रचण्यात आला पाळणा
स्वराज्याचे धाकले छत्रपती शिवपुत्र संभाजी महाराजांचा पराक्रमी इतिहास पाळणा गीतातून समोर येणार आहे. यासाठी कोल्हापुरातील शिव-शाहू पोवाडा मंचच्या वतीनं आणि शाहीर दिलीप सावंत यांच्या पुढाकारानं या पाळणा गीताची निर्मिती करण्यात आली आहे. कोल्हापूरचे श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या उपस्थितीत या चित्रफितीचं नुकतंच प्रसारण करण्यात आलं. हा पाळणा कोल्हापुरातील कलाकार वेदु सोनुले, तृप्ती सावंत, वैदेही जाधव यांनी गायला आहे.
हेही वाचा -
- घाटकोपर होर्डिंग दुर्घटना : पोलीस कल्याण निधीच्या वादात निष्पापांचे बळी ? किरीट सोमय्यांचे गंभीर आरोप - Ghatkopar Hoarding Collapse
- शिक्षक आणि पदवीधर मतदार संघाची निवडणूक पुढे ढकलली, वाचा कारण... - Postponed election of teachers
- राज्यात निवडणूक प्रचारात जुमलेबाजीची 'दीवार' - Lok Sabha Election 2024