ठाणे : आपला जीव धोक्यात घालत 13 मजली इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून पडणाऱ्या दोन वर्षीच्या चिमुरड्याला तरुणानं धाव घेत त्याला पकडल्यान त्याचा जीव बचावला. ही घटना डोंबिवली पश्चिम भागातील अनुराज हाइट्स टॉवरमध्ये घडली.
भावेश ठरला 'देवदूत' :चिमुरडा पडताना दिसताच इमारतीत राहणाऱ्या भावेश म्हात्रे नावाच्या तरुणानं जीवाची पर्वा न करता चिमुरड्याला वाचवण्यासाठी धाव घेतली. यावेळी चिमुरडा त्यांच्या हातातून निसटून पायावर पडला. या घटनेत चिमुकला किरकोळ जखमी झाला आहे काळजाचा थरकाप उडविणारी घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
काळ आला होता पण वेळ आली नव्हती : मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवली पश्चिम भागात गावदेवी मंदिराजवळील देवीचापाडा परिसरात अनुराज हाइट्स नावानं 13 मजल्याची इमारत आहे. या इमारतीत काल (दि.25) दुपारी पावणे दोनच्या सुमारास इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून बाल्कनीतून दोन वर्षाच्या चिमुरड्याचा तोल गेल्यानं खाली पडला. त्याचवेळी इमारतीतून बाहेर येत असलेल्या भावेश एकनाथ म्हात्रे यां तरुणानं चिमुरड्याला खाली पडताना पाहिलं. प्रसंगावधान राखत त्यांनी लगेच धाव घेतली. जीवाची पर्वा न करता झेप घेत चिमुरड्याला पकडण्याचा प्रयत्न केला. चिमुरड्याचा पूर्णपणं आधार न मिळाल्यानं तो त्यांच्या हातातून सरकत पायावर पडला. ही घटना पाहून इमारतीमध्ये एकच खळबळ उडाली. दरम्यान भावेश म्हात्रे यांच्या धाडसाचं स्थानिकांकडून कौतुक होत आहे. त्यांची तत्परता आणि संवेदनशीलता यामुळे एका लहान बाळाचा जीव वाचला आहे. भावेश म्हात्रे आता डोंबिवलीतील लोकांसाठी प्रेरणादायी ठरले आहेत. त्यांच्या या कृतीमुळे 'नशीब बलवत्तर म्हणून जीव वाचला' ही म्हण पुन्हा एकदा खरी ठरली आहे.
हेही वाचा :
- प्रजासत्ताक दिन अन् स्वातंत्र्य दिनी मेगा ब्लॉकसारखे प्रकार नको, खासदार सुप्रिया सुळे यांची मागणी
- अभिनेता सैफच्या घरातील ठशांशी आरोपीचे ठसे जुळेना, 'त्या' दोन व्यक्तींचा पोलिसांकडून शोध सुरू
- महाराष्ट्रातले 'पद्म' पुरस्कार विजेते 'ईटीव्ही भारत'वर Exclusive