मुंबई :अयोध्येतील राम मंदिराचे उद्घाटन 22 जानेवारीला होणार आहे. या दिवशी राम मंदिरात राम लल्ला विराजमान होणार आहे. हा सोहळा देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. या उत्सवानिमित्त केंद्र सरकारनं अर्धा दिवस सुट्टी जाहीर केल्यानंतर आता महाराष्ट्रात सरकारनंही 22 जानेवारीला सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. महाराष्ट्रापूर्वी देशातील काही राज्यांनी या दिवशी सुट्टी जाहीर केली आहे.
कार्यक्रमाला देश-विदेशातील मान्यवरांची हजेरी : 22 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येतील राम मंदिराचं उद्घाटन होणार असून या कार्यक्रमासाठी देश-विदेशातील 6 हजारांहून अधिक व्हीआयपी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. त्यात राजकीय नेते, अभिनेते, उद्योगपती, क्रीडा क्षेत्रातील व्यक्तींचा समावेश आहे.
केंद्र सरकारकडून सुटी जाहीर :प्रभू राम मंदिराच्या उद्घाटनासाठी अनेक राज्यांमध्ये सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. केंद्र सरकारनं 22 जानेवारी रोजी केंद्रीय संस्था, इतर केंद्रीय औद्योगिक आस्थापनांमधील कर्मचाऱ्यांसाठी अर्धा दिवस सुट्टी जाहीर केली आहे. त्या दिवशी दुपारी 2.30 वाजता कार्यालयीन कामकाज सुरू होईल.
अनेक नेत्यांनी केली होती मागणी : रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर 22 जानेवारीला सुट्टी जाहीर करावी, अशी मागणी आमदार सत्यजित तांबे, आमदार राम कदम यांच्यासह अनेक नेत्यांनी केली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनाही पत्र लिहिले आहे. सर्व शासकीय तसंच निमशासकीय कार्यालये; शाळा, महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्याची विनंती करण्यात आली. 22 जानेवारी रोजी अनेक नागरिक बाहेर निघणार आहेत. त्यामुळं वाहतुकीची समस्या निर्माण होऊ शकते. महाराष्ट्र सरकारनं याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. मात्र, आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली. हा दिवस एखाद्या सणासारखा साजरा करण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील नागरिकांना केलं आहे.