अहमदनगर (संगमनेर) Sangamner Rape News : दहावीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडलीय. या घटनेनं संगमनेर तालुक्यात खळबळ उडाली आहे. त्यामुळं अल्पवयीन मुलीनं बदनामीच्या भीतीनं आत्महत्या केली आहे. याप्रकरणी संगमनेर तालुक्यातील घारगाव पोलीस ठाण्यात पाच आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. दहावीचं हॉल तिकीट काढण्यासाठी गेलेल्या मुलीवर अत्याचार करण्यात आला. 29 फेब्रुवारी रोजी ही घटना घडली होती. या प्रकरणात चार जणांना अटक करण्यात आली असून, एका आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत.
तोंडाला रुमाल बांधत केला अत्याचार : दहावीत शिकणारी मुलगी गावात तिच्या परीक्षेचं हॉल तिकीट आणण्यासाठी गेली होती. यावेळी आरोपीनं तिला बळजबरीनं एका पान दुकानात नेलं. पानाच्या दुकानात आरोपीनं तिचे हात, पाय बांधले. तसंच तोंडाला रुमालानं बांधून तिच्यावर बलात्कार केला. यात आणखी इतर मित्रांनी देखील आरोपीला मदत केली. अत्याचाराच्या वेळी आरोपीनं पान दुकानाचं शटर बंद करून बाहेरून कुलूप लावलं होतं. तर, आरोपीचे इतर मित्र पान दुकानाबाहेर पाळत ठेवून होते. त्यावेळी तिथं आलेल्या एका गावकऱ्याला 'तू इथे का आलास, निघून जा', असं धमकावत शिवीगाळ केली. त्यानंतर अल्पवयीन मुलीनं आरोपीच्या तावडीतून पळ काढत घर गाठलं. या घटनेमुळं पालकांची बदनामी होईल, या भीतीनं अल्पवयीन मुलीनं आत्महत्या करत जीवनयात्रा संपवली. या घटनमुळे संपूर्ण संगमनेर तालुक्यात खळबळ उडाली आहे.