ठाणे :राज्यात 'ऑक्टोबर हिट'ला सुरूवात झाली. शनिवारी (5 ऑक्टोबर) ठाण्यात भरदुपारी पार पडलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या अनेकांना चक्कर येणं, उच्च रक्तदाबाचा त्रास झाला. दरम्यान, सभा मंडपात पाणी आतमध्ये घेऊन जाण्यास मज्जाव केल्यानं अनेकांना पाण्याशिवाय राहावं लागलं. सभेच्या ठिकाणी ९८ नागरिकांना 'ऑक्टोंबर हिट'चा फटका बसल्याचं सिव्हील रुग्णालय आणि पालिकेच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आलं. शनिवारी शहरात ३३.२ अंश सेल्सिअस तापमान होतं.
कार्यक्रमाला १ लाख नागरिक हजर : शनिवारी घोडबंदर भागातील बोरीवडे येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थित महिला सशक्तीकरण, भूमिपूजन आणि लोकार्पण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमासाठी ठाणे, भिवंडी, मीरा भाईंदर आदी भागातून सुमारे १ लाख नागरिक आले होते. दुपारी ४ वाजता मोदी हजेरी लावणार असल्यानं दुपारी १ वाजता नागरिकांना बोलवण्यात आलं होतं.
खबरदारी घेतली : खारघर येथील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर विशेष खबरदारी घेतण्यात आली. सभेच्या परिसरात १०० बेडचं तात्पुरतं रुग्णालय उभारण्यात आलं होतं. तसंच खासगी आणि शासकीय रुग्णालयात ५०० बेड राखीव ठेवण्यात आले होते. याशिवाय उन्हाचा त्रास होऊ नये, यासाठी कार्यक्रमाला आलेल्या प्रत्येकाच्या हाती खाण्याचं पाकीट आणि 'ओआरएस' पाण्याची सुविधासुद्धा पुरवण्यात आली होती.
१ किलोमीटर पायपीट : दरम्यान, बस स्टॉप ते सभा मंडपापर्यंत १ किलोमीटर पायपीट करावी लागल्यानं अनेकांनी संताप व्यक्त केला. त्यातच नवरात्र उत्सव सुरू असल्यानं अनेक महिलांचे उपवास चालू आहेत. त्यामुळं महिलांना जास्त त्रास झाला. तसेच कार्यक्रम ठिकाणी पंख्यांची सुविधा होती. तरी सुद्धा काहींना उन्हाचा त्रास झाल्यानं त्यांच्यावर तत्काळ उपचार करण्यात आले. यात काहींना चक्कर येणे, रक्तदाब कमी-अधिक होणे असा त्रास जाणवला. मात्र, त्यांच्यावर तत्काळ उपचार करून सोडण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेनं दिली.
हेही वाचा -
- "उद्धव ठाकरे यांच्या हट्टापायी..."; पंतप्रधान मोदींची बोचरी टीका - Narendra Modi On Uddhav Thackeray
- महायुतीत पडणार खिंडार! अमरावती मतदार संघावर भाजपाचा दावा - Maharashtra Assembly Election 2024
- पंतप्रधान मोदींकडून नंगारा भवनाचं उद्घाटन, बंजारा समाजाच्या 'काशी'त वाजवले नगारे - PM NARENDRA MODI SPEECH IN WASHIM