महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सावधान! सायबर गुन्हेगारांनी 75 वर्षीय वृद्धाला घातला तब्बल 11 कोटी रुपयांचा गंडा - BIGGEST CYBER FRAUD OF 2024

गुंतवणुकीतून चांगल्या परताव्याचं आमिष दाखवून लुटीचा सध्या प्रयत्न होताना दिसतोय. असंच एका वृद्धाला ट्रेडिंग व्यवहारात तब्बल ११ कोटी रुपयांना फसवण्यात आलय.

प्रातिनिधिक चित्र
प्रातिनिधिक चित्र (AI)

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 27, 2024, 9:25 PM IST

मुंबई - शहरातील या वर्षातील दुसऱ्या सर्वात मोठ्या सायबर फसवणुकीत, 75 वर्षीय कुलाबा येथील सेवानिवृत्त जहाज कप्तानला शेअर ट्रेडिंग घोटाळ्याद्वारे सायबर फसवणूक करणाऱ्यांनी अंदाजे 11.16 कोटी रुपयांचा गंडा घातला. याप्रकरणी दक्षिण सायबर पोलिसांनी सोमवारी गुन्हा दाखल केलाय.

यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, सुरुवातीला 19 ऑगस्ट 2024 रोजी, तक्रारदाराचा मोबाईल नंबर एका प्रमुख वित्तीय सेवा कंपनीचे नाव असलेल्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये जोडला गेला. अन्या स्मिथ नावाच्या एका महिलेनं ग्रुपवर माहिती अपलोड केली आणि सहकारी सदस्यांना विचारलं की ते त्यांच्या प्लॅटफॉर्म आणि धोरणाद्वारे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास तयार आहेत का. व्हॉट्सॲप ग्रुपच्या नावाला दुजोरा देत तक्रारदार, शेअर बाजारातील नियमित गुंतवणूकदाराने महिलेला आपली संमती दिली.

यानंतर स्मिथने आपलं नाव दुसऱ्या ग्रुपमध्ये जोडलं आणि एक लिंकही शेअर केली. तक्रारदाराने लिंकवर क्लिक केलं आणि ट्रेडिंगसाठी कंपनीचं ॲप डाउनलोड केलं. यानंतर, त्याला स्मिथ आणि तिच्या सहकाऱ्यांकडून संस्थात्मक खाते ट्रेडिंग, ओटीसी ट्रेडिंग, आयपीओ इत्यादींबाबत संदेश मिळू लागले, असं तक्रारदारानं एफआयआरमध्ये म्हटलं आहे.

स्मिथ आणि तिच्या सहकाऱ्यांनी शिफारस केलेल्या स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्यासाठी तक्रारदाराला वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये पैसे पाठवायला लावले. अनेक बँक खात्यांवर संशय आल्यानं वृद्ध व्यक्तीनं तिला याबाबत विचारलं असता, तिनं कर वाचवण्यासाठी असं केलं जात असल्याचं सांगितलं.

5 सप्टेंबर ते 19 ऑक्टोबर दरम्यान, तक्रारदाराने आरोपींच्या निर्देशानुसार 22 व्यवहारांमध्ये 11.16 कोटी रुपये विविध बँक खात्यांमध्ये पाठवले, असं एफआयआरमध्ये म्हटलं आहे.

हे व्यवहार करताना, तक्रारदाराला फारसा संशय आला नाही, कारण तो कंपनीच्या ॲपवर हे सगळे व्यवहार पाहू शकत होता. त्यानुसार पैसे त्याच्या खात्यात जमा होत आहेत तसंच गुंतवणुकीवर कमावलेला नफाही दिसत होता, असं पोलीस सूत्रांनी सांगितलं.

ट्रेडिंग कंपनीच्या ॲपमध्ये त्याच्या खात्यात मोठा नफा पाहून तक्रारदाराला खूप आनंद झाला. मात्र, जेव्हा त्याने नफा मिळालेले पैसे काढून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याची विनंती नाकारण्यात आली. त्यानंतर त्याने स्मिथशी संपर्क साधून त्याचा नफा काढण्यासाठी मदत मागितली.

त्यानंतर स्मिथने त्याला सांगितलं की संपूर्ण रकमेवर 20 टक्के सेवा कर भरावा लागेल. तक्रारदाराने हा “सेवा कर” भरला असूनही, त्याला पैसे काढण्यासाठी इतर शुल्कापोटी अधिक पैसे देण्यास सांगण्यात आले. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचं त्याला जाणवलं, असं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं.

तक्रारदार त्यांच्या शंका दूर करण्यासाठी आणि तक्रार करण्यासाठी ते वित्तीय सेवा कंपनीच्या मुख्य कार्यालयात गेले. तेथे फसवणूक करणाऱ्या कंपनीत पैसे गुंतवल्याची माहिती मिळाली, त्यावेळी वाद आणि धक्काबुक्की झाली. यानंतर त्यांनी पोलिसात जाऊन तक्रार दाखल केली. आता दक्षिण प्रादेशिक सायबर पोलिसांनी दोन अज्ञात फसवणूक करणाऱ्यांविरुद्ध भारतीय दंड संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत, तक्रारदाराला गुंतवणुकीच्या उद्देशाने ज्या कंपनीच्या बँक खात्यांमध्ये पैसे जमा करण्यात आले होते, ती युको बँक, आयसीआयसीआय बँक, कॅनरा बँक, बंधन बँक, बँक ऑफ महाराष्ट्र आणि कॅथलिकमध्ये वेगवेगळ्या व्यक्तींकडे असल्याचं उघड झालं आहे. भोपाळ, वांद्रे (मुंबई), नागपूर, सुरत, हैदराबाद, गाझीपूर, लखनौ, बनासकांठा, हावरा, भरूच येथे शाखा असलेल्या सीरियन बँकेच्या भिलाई आणि जयपूर शाखांचा यात वापर झाल्याचं दिसून आलं.

या वर्षी एप्रिलमध्ये, शहराच्या पश्चिम उपनगरातील एका ज्येष्ठ नागरिकाची डिजिटल अटक करुन सायबर फसवणूक पद्धतीने सुमारे 25 कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली होती. मुंबईतील या वर्षातील हे सर्वात मोठं सायबर फसवणूक प्रकरण आहे. सीबीआय अधिकारी असल्याचं भासवणाऱ्या फसवणूक करणाऱ्यांनी वृद्ध महिलेला घाबरवलं होतं. त्यांनी सांगितलं की तिचं नाव मनी लाँडरिंग प्रकरणात आलंय आणि नंतर त्यांनी तिला फसवलं. पडताळणी प्रक्रियेच्या नावाखाली तिची जीवनभराची जमा पुंजी लुटून तिची फसवणूक केली. सायबर पोलीस विभागातील सूत्रांनी सांगितलं की, ती पोलिसांकडे उशिरा पोहोचल्यानं पोलिसांना केवळ 5 लाख रुपये वाचवता आले.

अशी प्रकरणं समोर येत असल्यानं, सायबर फसवणूक करणाऱ्यांनी लक्ष्य केल्यास नागरिकांनी राष्ट्रीय सायबर गुन्हे हेल्पलाइन क्रमांक 1930 वर त्वरित संपर्क साधावा, असं आवाहन सायबर पोलिस अधिकाऱ्यांनी केलं आहे. जितक्या लवकर पीडित व्यक्ती हेल्पलाइनशी संपर्क साधतील तितक्या लवकर गमावलेले पैसे परत मिळण्याची शक्यता जास्त आहे, असं सायबर पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं.

हेही वाचा..

  1. सायबर फसवणूक प्रकणात पोलिसांना मोठं यश, 84 वर्षीय वृद्धाला 53 लाख रुपये दिले परत
  2. व्हॉट्सॲप तुम्हालाही आलीय नोकरीची ऑफर?, सावधान!..अन्यथा खावी लागणार जेलची हवा, कसं ओळखायचं 'व्हॉट्सॲप' स्कॅम?

ABOUT THE AUTHOR

...view details