ठाणे Thane Murder Case: ऑनलाईन क्रिकेट जुगारामुळं (Online Gambling) आपल्यावर झालेले कर्ज फेडण्यासाठी डोंबिवली पश्चिमेतील शास्त्रीनगर रुग्णालय परिसरात राहणाऱ्या एका २८ वर्षाच्या तरूणाने तो राहत असलेल्या इमारतीमधीलच एका ६२ वर्षीय वृध्द महिलेचा खून (Woman Murder) केल्याची धक्कादायक घटना घडलीय. खळबळजनक बाब म्हणजे तिच्या खून करून गळ्यातील सोन्याचा ऐवज लुटून तरुणानं पळ काढला होता. मात्र विष्णुनगर पोलिसांनी (Vishnu Nagar Police) तातडीनं याप्रकरणाचा तपास करून तरूणाला सहा तासातच अटक केली. यश सतीश विचारे (२८, रा. वसंत निवास, शास्त्रीनगर) असं अटक आरोपी तरूणाचं नाव आहे. तर आशा अरविंद रायकर (६२, रा. वसंत निवास, पहिला माळा, गोल्डन नेक्सट सोसायटीच्या मागे, शास्त्रीनगर, डोंबिवली पश्चिम) असं खून झालेल्या महिलेचं नाव आहे.
अशी घडली घटना :पोलीस उपायुक्त सचीन गुंजाळ यांनी सांंगितलं की, मृतक आशा रायकर घरात एकट्याच राहत होत्या. त्यांच्या गळ्यात सोन्याची माळ, कर्णफुले होती. खून केल्यानंतर त्यांच्या अंगावरील सोन्याचा ऐवज गायब होता. चोरीच्या उद्देशानं हा खून झाल्याचा अंदाज व्यक्त करत त्यादिशेनं वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक गहिनीनाथ गमे, साहाय्यक निरीक्षक सचीन लोखंडे, पोलीस उपनिरीक्षक दीपविजय भवर यांच्या पथकानं वसंत निवासमध्ये राहणाऱ्या आरोपी यश सतीश विचारे या तरूणाला ताब्यात घेतलं. त्याची कसून चौकशी सुरू केली असता त्याने खुनाची कबुली दिली.
आरोपीला ऑनलाईन जुगार खेळण्याचं व्यसन : आरोपी यश विचारे याने आपण कर्जबाजारी आहोत. ते कर्ज फेडण्यासाठी आपण आशा रायकर यांच्या अंंगावरील दागिने चोरल्याची माहिती दिली. तसेच आरोपी यशला मोबाईलमध्ये बेटिंग लोटस ३६५ या जुळणीवर क्रिकेटचा ऑनलाईन जुगार खेळण्याचं व्यसन आहे. या जुगाराच्या माध्यमातून यशवर ६० हजार रूपयांचे कर्ज झाले होते. कर्ज देणारे यशच्या मागे तगादा लावून ते फेडण्यासाठी आग्रह करत होते. जवळ पैसे नसल्यानं यशनं शक्कल लढून आपल्याच इमारतीमधील आशा रायकर यांचा खून करून त्यांच्या जवळील सोन्याचे दागिने चोरून त्या माध्यमातून पैसे उभे करण्याचं ठरविलं होतं.